आमणी येथे महिलांचे दारूबंदीसाठी पोलिस ठाण्यात ठिय्या आंदोलन

महागाव प्रतिनिधी संजय नागरगोजे
आमणी गावातील अवैध मोहाच्या दारूविक्रीविरोधात संतप्त झालेल्या महिलांनी पुन्हा एकदा पोलिस स्टेशनमध्ये ठिय्या आंदोलन छेडले. “जोपर्यंत गावातील अवैध मोहाची दारू पूर्णपणे बंद होत नाही, तोपर्यंत पोलिस स्टेशनमधून हटणार नाही,” अशी ठाम भूमिका महिलांनी आज सायंकाळी सुमारे आठ वाजता घेतली.
यापूर्वीही महिलांनी पोलिस ठाण्यात मोठे आंदोलन केले होते. मात्र त्यानंतरही गावातील अवैध दारू व्यवसाय सुरूच असल्याचा आरोप महिलांनी केला. गावात दारूमुळे अनेक कुटुंबांची शोकांतिका होत असल्याचे सांगत, “साधी दारूबंदीची कारवाई होत नसेल तर जनतेला न्याय कसा मिळणार?” असा संतप्त सवाल आंदोलनकर्त्या महिलांनी उपस्थित केला.
महिलांनी पोलिस प्रशासनाकडे तात्काळ कारवाईची मागणी करत अवैध दारू तयार करणाऱ्यांवर आणि विक्री करणाऱ्यांवर कडक गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे. गावातील शांतता आणि कुटुंबांचे भवितव्य धोक्यात येत असल्याने प्रशासनाने तातडीने पावले उचलावीत, अन्यथा भविष्यात अधिक तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला.
सदर आंदोलनामुळे काही काळ पोलिस ठाण्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिस अधिकाऱ्यांनी महिलांशी चर्चा करून योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिल्याची माहिती मिळाली आहे.



