हिमायत नगर: वॉर्ड १३ मधील महिलांचा नगरपंचायतीवर ‘रिकाम्या घागरी’ मोर्चा! निवडणुकीतील ‘बोर’चा वायदा हवेत; ५०% आरक्षण असूनही महिलांना पाण्यासाठी वणवण

हिमायत नगर (तालुका प्रतिनिधी शेख खयुम खूरेशी):
निवडणुकीच्या काळात “मतदान करा, वॉर्डात बोर पाडू” असे आश्वासन देऊन सत्ता मिळवणाऱ्या लोकप्रतिनिधींना आज वॉर्ड क्रमांक १३ मधील महिलांनी प्रशासकीय इमारतीवर धडक देत खडे बोल सुनावले. हक्काच्या पाण्यासाठी त्रस्त झालेल्या या रणरागिणींनी नगरपंचायतीच्या उंबरठ्यावर रिकाम्या घागरींसह ठिय्या मांडला. “आम्हाला निव्वळ आश्वासने नकोत, तर हक्काचे पाणी द्या,” या मागणीने संपूर्ण नगरपंचायत परिसर दणाणून गेला.
संवैधानिक अधिकाराची पायमल्ली?
भारतीय संविधानाच्या ७३ व्या आणि ७४ व्या घटनादुरुस्तीनुसार स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना ५०% आरक्षण देण्यात आले आहे. हे आरक्षण केवळ राजकीय फायद्यासाठी नसून महिलांच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी आहे. मात्र, हिमायत नगरमध्ये महिलांना पाण्यासाठी मैलोन्मैल पायपीट करावी लागत असल्याने, “प्रशासन आमच्या घटनात्मक अधिकाराचा सन्मान कधी करणार?” असा संतप्त सवाल आंदोलक महिलांनी उपस्थित केला आहे.
ठळक मुद्दे:
फसवे आश्वासन: लोकप्रतिनिधींनी निवडणुकीपूर्वी दिलेला ‘बोरवेल’चा शब्द पाळला नसल्याचा महिलांचा आरोप.
प्रशासकीय इमारतीवर ठिय्या: रिकाम्या हंड्यांसह महिलांनी कार्यालयाच्या पायऱ्यांवर बसून संताप व्यक्त केला.



