श्री क्षेत्र माहूरगड येथे कृषी तंत्रज्ञान व पिक व्यापार परिषद उत्साहात

महागाव प्रतिनिधी संजय नागरगोजे
दि. 15 फेब्रुवारी 2026 – श्री क्षेत्र माहूरगड येथे शेतकरी संघटनेच्या माध्यमातून कृषी तंत्रज्ञान व पिकांचा व्यापार परिषद या एकदिवसीय अधिवेशनाचे आयोजन उत्साहात पार पडले. राज्यातील विविध भागांतून शेतकरी, उद्योजक आणि कृषी क्षेत्रातील जाणकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या अधिवेशनाचे उद्घाटन नाशिक जिल्ह्याचे भूमिपुत्र व डॉ. विलास अण्णा शिंदे, संस्थापक अध्यक्ष – सह्याद्री फार्मर प्रोड्यूसर कंपनी, नाशिक यांच्या हस्ते झाले. शून्यातून सुरुवात करून आज सुमारे ७०० कोटी रुपयांच्या उलाढालीचा कृषी उद्योग उभा करणारे शिंदे हे राज्यातील द्राक्ष, डाळिंब व इतर फळपिकांचे नामांकित निर्यातदार म्हणून ओळखले जातात. देश-विदेशात त्यांचे कार्य विस्तारले असून शेतकरी उत्पादक कंपन्यांसाठी ते प्रेरणास्थान मानले जातात.
मराठवाडा व विदर्भातील संत्रा-मोसंबी उत्पादनाला चालना देण्यासाठी नांदेड जिल्ह्यात सुमारे ३५० कोटी रुपयांचा प्रक्रिया प्रकल्प उभारून त्यांनी स्थानिक तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत. मूल्य साखळी संवर्धनाच्या माध्यमातून शेतमालाला अधिक दर मिळवून देण्याचा त्यांचा ठाम दृष्टिकोन अधिवेशनात मांडण्यात आला.
यावेळी यवतमाळ जिल्ह्यातील कापूस उत्पादकांसाठी कॉटन टेक्सटाईल पार्क उभारण्याबाबत चर्चा करण्यात आली. कापसावर स्थानिक पातळीवर प्रक्रिया होऊन शेतकऱ्यांना अधिक मोबदला मिळावा, या हेतूने पुढाकार घेण्याबाबत सकारात्मक विचारविनिमय झाला.
अधिवेशनात शेतकरी संघटनेच्या वतीने आंदोलक म्हणून आपला सत्कार करण्यात आला. डॉ. शिंदे यांच्यासोबत संवाद साधण्याची संधी लाभली. एका सामान्य शेतकऱ्याने शून्यातून जागतिक स्तरावर झेप घेतलेली ही वाटचाल प्रत्येक शेतकऱ्यासाठी आदर्श व अभिमानास्पद असल्याचे यावेळी मत व्यक्त करण्यात आले. अत्यंत साधेपणाने व आत्मीयतेने त्यांनी सर्वांशी संवाद साधला.
डॉ. शिंदे यांनी नाशिक येथील सह्याद्री फार्मर कंपनीला भेट देण्याचे निमंत्रण दिले असून लवकरच त्या प्रकल्पाला भेट देण्याचे नियोजन करण्यात येणार आहे.



