बाहेरच्या शत्रूपेक्षा ‘घरभेदी’ घातक; स्वातंत्र्याच्या ७८ वर्षांनंतरही हिमायतनगरमध्ये महिलांचे जीणे असह्य!

हिमायतनगर (ता प्रतिनिधी शेख खयुम खूरेशी):
“देशाला सीमेवरील शत्रूंपेक्षा समाजाला आतून पोखरणाऱ्या हफ्ताखोर आणि व्यसनाधीन प्रवृत्तींचा मोठा धोका निर्माण झाला आहे,” असा संताप हिमायतनगरच्या महिला आणि जागरूक नागरिकांनी व्यक्त केला आहे. स्वातंत्र्याची ७८ वर्षे उलटली तरी, येथील माता-भगिनी आजही अवैध धंद्यांच्या गुलामगिरीत जगत आहेत.
मटका आणि दारूने उध्वस्त झाली घरे:
शहरात राजरोस सुरू असलेल्या मटका आणि गावठी दारूच्या अड्ड्यांमुळे अनेक संसार उघड्यावर आले आहेत. दिवसभर कष्ट करून कमावलेला पैसा पुरुष मटक्यात हरतात आणि उरलेला पैसा दारूवर उडवतात. याचा थेट परिणाम घरातील चुल पेटण्यावर होत असून, मुलांना दोन वेळच्या अन्नासाठी मोताद व्हावे लागत आहे.
महिलांची सुरक्षा आणि संविधानाचा अवमान:
मटक्यात पैसे हारल्यानंतर आणि दारूच्या नशेत पुरुषांकडून महिलांना अमानुष मारहाण केली जात आहे. भारतीय संविधानाने महिलांना सन्मानाने जगण्याचा अधिकार दिला असताना, येथील माफियांच्या “हफ्ताखोरीमुळे” प्रशासनाने डोळे झाकून घेतल्याची टीका होत आहे. जेव्हा रक्षकच भक्षक बनतात, तेव्हा स्वातंत्र्याचा अर्थ उरत नाही.
सणासुदीच्या काळात स्फोटक स्थिती:
आगामी महाशिवरात्री आणि रमजानच्या पार्श्वभूमीवर, या अवैध धंद्यांमुळे शांतता भंग होण्याची दाट शक्यता आहे. “जर बाहेरून संकट आले तर देश लढू शकतो, पण घरातच बसलेले हे ‘घरभेदी’ तरुण पिढी आणि महिलांचे आयुष्य उद्ध्वस्त करत आहेत,” अशी भावना व्यक्त करत नागरिकांनी आता आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे.



