हिमायतनगर वार्ड क्रमांक १३ आणि उमर चौक ते ग्रामीण रुग्णालय मुख्य बायपास रस्ता पूर्णपणे नरकमय; लोकप्रतिनिधी आणि नगरसेवक आपल्या आलिशान गाड्यांमध्ये मस्त, तर रुग्ण आणि गरीब जनता चिखलात त्रस्त!

हिमायतनगर ,(तालुका प्रतिनिधी: शेख खय्यूम)
हिमायतनगर: येथील वार्ड क्रमांक १३ तसेच उमर चौक ते बायपास मार्गे ग्रामीण रुग्णालय जाणाऱ्या मुख्य रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून संपूर्ण परिसराला चिखल आणि घाणीचे साम्राज्य लाभले आहे. यातच सय्यद शमशीर भाई यांच्या घरासमोरील रस्ता देखील प्रचंड खराब झाला असून तिथे चालणेही कठीण झाले आहे. “यापेक्षा जेव्हा नगरपंचायतीवर प्रशासक राज होते, तेव्हा गावची परिस्थिती बरी होती. जेव्हापासून नगरसेवक निवडून आले आणि नगरपंचायत निवडणुका झाल्या, तेव्हापासून गावून पूर्णपणे खराब झाले आहे,” असा संतप्त आरोप स्थानिक नागरिक करत आहेत.
या अजब कारभारावर संताप व्यक्त करताना वॉर्डातील नागरिक आता थेट विचारत आहेत की, “निवडून आलेले हे लोकप्रतिनिधी अशाच प्रकारे ५ वर्षे आमच्यावर जुलमी राज करणार का? आमच्या मतांवर मोठे होऊन हे लोक आम्हालाच चिखलात सडवणार का?”
विशेष म्हणजे, कडक उन्हाळ्यात जेव्हा पाण्याची तीव्र टंचाई होती, तेव्हा नगरपंचायतीने नागरिकांना नळाचे कनेक्शन दिले नाही. आता ऐन पावसाळ्यात जागोजागी खड्डे खणून नळ कनेक्शन देण्याचा सपाटा लावला आहे, ज्यामुळे रस्त्यांवर चिखलाचे प्रमाण अधिक वाढले आहे. मुद्दाम चिखल करून जनतेला नाहक त्रास देण्यासाठीच हा कारभार सुरू आहे का? असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत. जनतेने थेट सवाल केला आहे की, “जर रस्त्यासाठी नवीन बजेट आले नसेल, तर किमान मुरूम किंवा चोई (दगडी पूड) आणून टाकण्याचा अधिकारही या नगरसेवकांना आणि नगरपंचायत प्रशासनाला नाही का?”
”या चिखलावरून चालताना जर एखादा लहान मूल घसरून पडले आणि त्याचा हात-पाय तुटला, तर त्याला जबाबदार नगरपंचायत प्रशासन राहणार, संबंधित नगरसेवक राहणार की येथील लोकप्रतिनिधी?” असा थेट आणि रोकडा सवाल नागरिक विचारत आहेत. या अजब कारभारामुळे एखादी इमर्जन्सी असल्यास गंभीर रुग्ण किंवा गर्भवती महिलांनी या चिखलातून रुग्णालयात कसे जावे, असा तीव्र प्रश्न उपस्थित केला जात आहे.
निवडून आलेले नगरसेवक आणि लोकप्रतिनिधी स्वतः मात्र श्रीमंत होऊन मोठ्या फोर-व्हीलर व टू-व्हीलर गाड्यांमधून फिरतात. त्यांना पादचाऱ्यांच्या आणि सर्वसामान्यांच्या त्रासाशी काहीही देणेघेणे उरलेले नाही, असा थेट आरोप वार्ड क्रमांक १३ मधील जनतेने केला आहे. नगरपंचायत प्रशासनाने आणि लोकप्रतिनिधींनी हा नियोजनशून्य कारभार तात्काळ सुधारावा आणि या मरण मार्गावर त्वरित चोई-मुरूम टाकून दुरुस्ती करावी, अन्यथा लोकप्रतिनिधींना धारेवर धरत नगरपंचायतीवर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे.



