Uncategorized

सवना-वाकोडी मार्गाच्या निकृष्ट कामाविरोधात नागरिकांचे आंदोलन; ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्याची मागणी


महागाव प्रतिनिधी : संजय नागरगोजे
महागाव तालुक्यातील सवना ते वाकोडी मार्गाचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे झाल्याचा आरोप करत नागरिकांनी दि. ३ जुलै २०२६ रोजी शुक्रवारी भर पावसात रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन केले. यावेळी ठेकेदाराला काळ्या यादीत टाकावे आणि रस्त्याच्या कामाची गुणवत्ता नियंत्रण विभागामार्फत (क्वालिटी कंट्रोल) सखोल चौकशी करावी, अशी मागणी करण्यात आली.
आंदोलनकर्त्यांनी पावसाच्या पाण्यात बसून निषेध व्यक्त केला. मागण्या मान्य न झाल्यास तुळजापूर-नागपूर महामार्गावर चक्काजाम आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला. या आंदोलनाचे छायाचित्रण आमच्या प्रतिनिधींनी केले असून नागरिकांच्या संतापाचे दृश्य कॅमेऱ्यात कैद झाले आहे.
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, रस्त्याच्या बांधकामात पारदर्शकता नसल्याने व गुणवत्तेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याने मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली आहे. या प्रकरणात सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने लक्ष घालून संबंधित कामाची चौकशी करावी, अशी मागणी होत आहे.
काही नागरिकांनी या परिस्थितीसाठी सार्वजनिक बांधकाम विभाग आणि लोकप्रतिनिधींना जबाबदार धरत, हा प्रश्न विधानसभेत का उपस्थित केला जात नाही, असा सवालही उपस्थित केला आहे.
सवना ते वाकोडी परिसरातील नागरिक आगामी काळात आणखी मोठे आंदोलन उभारण्याच्या तयारीत असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button