महागाव-फुलसांगवी मार्गावरील टेंभीजवळ मध्यभागी खड्डा; वारंवार अपघात, नागरिकांमध्ये संताप

महागाव प्रतिनिधी : संजय नागरगोजे
महागाव-फुलसांगवी मार्गावरील टेंभी परिसरात रस्त्याच्या मध्यभागी मोठा खड्डा पडल्याने वारंवार अपघात घडत असून नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. पावसाचे पाणी साचल्यामुळे खड्डा वाहनचालकांच्या नजरेस पडत नसल्याने या ठिकाणी आतापर्यंत चार ते पाच अपघात झाल्याचा दावा स्थानिक नागरिकांनी केला आहे.
नागरिकांच्या म्हणण्यानुसार, भर पावसात तीन ते चार जण या खड्ड्यात पडून जखमी झाले असून काहींना हातपायांचे गंभीर दुखापतीही झाल्या आहेत. या धोकादायक परिस्थितीमुळे तातडीने दुरुस्तीची मागणी जोर धरत आहे.
सुमारे दीड वर्षांपूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत या मार्गाचे डांबरीकरण करण्यात आले होते. मात्र, हे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे. यासंदर्भात अनेक वेळा तक्रारी व वृत्तपत्रांमधून बातम्या प्रसिद्ध होऊनही संबंधित विभागाने अद्याप दखल घेतलेली नसल्याची खंत नागरिकांनी व्यक्त केली आहे. पूर्वी झालेली चौकशी गुंडाळून ठेवण्यात आली.
तसेच लोकप्रतिनिधींनी संबंधित ठेकेदार किंवा अधिकाऱ्यांना जाब का विचारला नाही, असा सवालही उपस्थित केला जात आहे. या रस्त्याच्या गुणवत्तेची गुणवत्ता नियंत्रण विभागामार्फत (क्वालिटी कंट्रोल) चौकशी करण्यात यावी आणि दोषी आढळणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.
मतदारसंघाचे आमदार या गंभीर प्रश्नाकडे लक्ष देऊन विधानसभेत हा मुद्दा उपस्थित करणार का, असा सवालही नागरिकांकडून विचारला जात आहे. Ll



