शहर

शेतकऱ्यांच्या आत्महत्या म्हणजे व्यवस्थेचे अपयश” – स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा आरोप


महागाव प्रतिनिधी संजय नागरगोजे
यवतमाळ जिल्ह्यात वाढत्या शेतकरी आत्महत्यांच्या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने शासन आणि प्रशासनावर तीव्र टीका केली आहे. “या आत्महत्या नव्हेत, तर शासन व्यवस्थेच्या अनास्थेमुळे घडणारे मृत्यू आहेत,” असा आरोप संघटनेचे प्रदेश प्रवक्ते मनीष जाधव यांनी केला.
जिल्ह्यातील २२ शेतकऱ्यांच्या आत्महत्यांची नैतिक जबाबदारी पालकमंत्री, संबंधित मंत्री आणि जिल्हा प्रशासनाने स्वीकारावी, अशी मागणीही त्यांनी केली. त्यांच्या मते, कागदावर घोषणांचा पाऊस पडत असला तरी प्रत्यक्षात ठोस उपाययोजनांचा अभाव असल्यामुळे शेतकरी अडचणीत सापडत आहेत.
जाधव यांनी पुढे म्हटले की, विरोधी पक्षात असताना काही नेत्यांनी शेतकरी आत्महत्यांबाबत कठोर भूमिका घेतली होती; मात्र सध्याच्या परिस्थितीत जिल्ह्यातील आत्महत्या रोखण्यात स्थानिक सत्ताधारी यंत्रणा निष्क्रिय ठरल्याचा आरोप त्यांनी केला.
महागाव तालुक्यात अलीकडे घडलेल्या शेतकरी आत्महत्यांच्या घटनांनंतर शासनाने नेमके कोणते धोरण अवलंबले आणि कोणती मदत दिली, याबाबतही स्पष्ट माहिती देण्याची मागणी संघटनेने केली आहे. प्रशासनाच्या उदासीनतेमुळे शेतकऱ्यांच्या समस्या दिवसेंदिवस वाढत असून या परिस्थितीची जबाबदारी कोण स्वीकारणार? असा सवाल जाधव यांनी उपस्थित केला.
दरम्यान, शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण कमी करण्यासाठी तातडीने प्रभावी उपाययोजना जाहीर कराव्यात, अन्यथा आंदोलनाचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने नेते मनीष जाधव यांनी दिला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button