विद्यार्थ्यांनी कॉपीमुक्त वातावरणात निर्भयपणे परीक्षा द्यावी मोहम्मद मुसद्दीक, केंद्र संचालक

सहसंपादक शेख मुजाहिद
फुलसावंगी :इयत्ता १० वी व १२ वीच्या माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षांना सुरुवात होत असून विद्यार्थ्यांना कॉपीमुक्त, शांत व सुरक्षित वातावरणात परीक्षा देता यावी, यासाठी शिक्षण विभागाकडून सर्व आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. फेब्रुवारी २०२६ पासून सुरू होणाऱ्या या परीक्षांच्या पार्श्वभूमीवर प्रशासन पूर्णतः सज्ज झाले आहे.
परीक्षेदरम्यान कोणत्याही प्रकारचे गैरप्रकार टाळण्यासाठी सर्व परीक्षा केंद्रांवर कडक बंदोबस्त ठेवण्यात आला असून प्रत्येक केंद्रावर CCTV यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. तसेच परीक्षा केंद्रांच्या परिसरात कलम १४४ लागू करण्यात आले असून अनावश्यक गर्दीवर निर्बंध घालण्यात आले आहेत.
परीक्षा प्रक्रिया सुरळीत, पारदर्शक व विश्वासार्ह पार पाडण्यासाठी शिक्षण विभाग, महसूल विभाग व पोलीस प्रशासन यांच्यात योग्य समन्वय साधण्यात आला आहे. यासाठी जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, गटशिक्षणाधिकारी, केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक तसेच पर्यवेक्षक शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे.
जिल्हाधिकाऱ्यांनी परीक्षा काळात कॉपीमुक्त वातावरण राखण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या असून विद्यार्थ्यांवर कोणत्याही प्रकारचा मानसिक ताण येऊ नये, याची विशेष काळजी घेण्याचे आदेश दिले आहेत.
यावेळी केंद्र संचालक मोहम्मद मुसद्दीक यांनी विद्यार्थ्यांना आवाहन केले की, त्यांनी कोणत्याही गैरप्रकारांचा अवलंब न करता नियमांचे पालन करून शांत, निर्भय व आत्मविश्वासाने परीक्षा द्यावी.



