रमजान अन् महाशिवरात्री तोंडावर, तरीही हिमायतनगर अंधारात; नगरसेवक पठाण आक्रमक

हिमायतनगर ता़(प्रतिनिधी शेख खयुम खूरेशी):
येत्या १८ फेब्रुवारीपासून पवित्र रमजान महिना आणि महाशिवरात्री उत्सव सुरू होत असून, या पार्श्वभूमीवर हिमायतनगर शहरातील पथदिव्यांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. शहरातील प्रभाग १ ते १७ मध्ये गेल्या ४ महिन्यांपासून पथदिवे आणि हायमस्त दिवे बंद असल्याने भाविकांची मोठी गैरसोय होत आहे. या गंभीर समस्येबाबत नगरसेवक सरदार खान खलील खान पठाण यांनी मुख्याधिकारी आणि नगराध्यक्षांना निवेदन देऊन तातडीने नियोजन करण्याची मागणी केली आहे.

रमजानमध्ये पहाटेची सहरी आणि रात्रीच्या तरावीह नमाजसाठी मुस्लीम बांधवांची मोठी वर्दळ असते. तसेच महाशिवरात्रीलाही भाविक मंदिरांमध्ये गर्दी करतात. मात्र, पथदिवे बंद असल्याने चोरीच्या घटना आणि अपघातांची भीती वाढली आहे. केवळ पथदिवेच नव्हे, तर शहरातील बंद पडलेले सार्वजनिक बोअरवेलही तात्काळ दुरुस्त करून पाणीपुरवठा सुरळीत करावा, असे पठाण यांनी निवेदनात म्हटले आहे. सणापूर्वी शहरातील अंधार दूर न झाल्यास तीव्र जनआंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.



