मुळावा फाटा–सावरगाव रस्त्यावर थरकाप उडवणारा अपघात; तरुणाचा मुंडका १२ किमीपर्यंत टँकरला अडकलेला

उमरखेड:-
मुळावा फाटा–इनापूर–सावरगाव रस्त्यावर शुक्रवारी (दि. ३१) सायंकाळी साडेसातच्या सुमारास झालेल्या भीषण मोटारसायकल अपघाताने संपूर्ण परिसर हादरून गेला. स्पर्धा परीक्षेची तयारी करणारा वैभव ढगे (वय २५, रा. सांडवा, ता. उमरखेड) याचा या अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला.
अपघाताची भीषणता इतकी प्रचंड होती की मृतकाचा मुंडका घटनास्थळावरून तब्बल १२ किलोमीटर अंतरावर असलेल्या सुशी इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीच्या रेल्वे कॅम्पपर्यंत डिझेल टँकरला अडकून गेला. या घटनेमुळे अपघाताची तीव्रता अंगावर काटा आणणारी ठरली आहे.
रेल्वे कॅम्पमधील मॅनेजर उपेंद्र यांनी अकोला–गायगाव येथून डिझेल घेऊन आलेल्या टँकरच्या मागील बाजूस मानवी मुंडका अडकलेला असल्याची माहिती दिल्यानंतर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. तपासादरम्यान मुळावा फाटा–इनापूर–सावरगाव रस्त्यावर खंडाळा हद्दीत मोटारसायकल (होंडा शाईन, क्र. MH 29 BN 4657) अपघातग्रस्त झाल्याचे स्पष्ट झाले.
खंडाळा पोलीस ठाण्याच्या ठाणेदारांशी संपर्क साधून नातेवाईकांच्या मदतीने मृताची ओळख पटविण्यात आली. पंचनामा करण्यासाठी मृतकाचा मुंडका ॲम्बुलन्सद्वारे ग्रामीण रुग्णालय, पुसद येथे पाठविण्यात आला आहे. या हृदयद्रावक घटनेमुळे परिसरात तीव्र हळहळ व्यक्त होत असून पुढील तपास खंडाळा पोलीस करीत आहेत.



