अवैध रेती वाहतूक करणाऱ्या टिप्परचा भीषण अपघात; दुचाकीवरील दोघांचा मृत्यू

महागाव प्रतिनिधी संजय नागरगोजे
महागाव तालुक्यातील हिवरा येथे अवैध रेती वाहतूक करणाऱ्या, फिटनेस नसलेल्या टिप्परने धडक दिल्याने दुचाकीवरील दोन तरुणांचा मृत्यू झाल्याची घटना दि. ३१ जानेवारी २०२६ रोजी दुपारी १२ वाजताच्या सुमारास घडली. या अपघातात आंबोडा येथील शुभम पाटे व देवानंद दोडके यांचा मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, मृतक एम.एम. २९ सी.एफ. ८७९९ क्रमांकाच्या दुचाकीने जात असताना समोरून येणाऱ्या एम.एच. ४० बी.एल. ९५४४ क्रमांकाच्या टिप्परने जोरदार धडक दिली. सदर टिप्पर अवैधरित्या ओव्हरलोड करून रेती वाहतूक करीत होता तसेच वाहनाचा फिटनेस नसल्याचा आरोप करण्यात येत आहे. आरटीओ पथक वाहनाच्या मागे असल्यामुळे टिप्पर चालकाने भरधाव वेगाने वाहन चालविल्याने हा अपघात झाल्याचे सांगितले जात आहे.
या धडकेत एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला, तर दुसऱ्या तरुणाचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती आहे.
महागाव तालुक्यात फिटनेस नसलेले टिप्पर मोठ्या प्रमाणावर रेती वाहतूक करीत असल्याचे नागरिकांचे म्हणणे असून, संबंधित विभागांकडून अपेक्षित कारवाई होत नसल्याचा आरोप होत आहे. विशेषतः हिवरा परिसरात बायपास नसल्यामुळे वारंवार अपघात होत असून, दोन दिवसांपूर्वीच ट्रॅव्हल्स वाहनाने दुचाकीस्वाराला उडवून त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली होती.
सलग अपघातांच्या पार्श्वभूमीवर अवैध व फिटनेस नसलेली वाहने तात्काळ जप्त करावीत तसेच हिवरा बायपास लवकरात लवकर पूर्ण करावा, अशी जोरदार मागणी हिवरा गावातील नागरिकांनी केली आहे.



