महागाव तहसीलमध्ये जमीन प्रकरणात मोठ्या भ्रष्टाचाराचा आरोप; आमरण उपोषण सुरू

महागाव प्रतिनिधी संजय नागरगोजे
महागाव तहसील कार्यालयात नायब तहसीलदार राणे प्रभारी तहसीलदार असताना भोगदार दोन (वर्ग २) जमिनी एकत्र करून बेकायदेशीर व्यवहार केल्याचा गंभीर आरोप पुढे आला आहे.
डोंगरगाव येथील बुद्ध समाजाचे शेतकरी हिरामण शंकर हाडसे व विमल बबन हाडसे (रा. कोपरा, ता. पुसद) हे अशिक्षित व ग्रामीण पार्श्वभूमीचे असल्याचा गैरफायदा घेत मोजा डोंगरगाव येथील सर्वे नं. १३८ क्षेत्रफळ ४ हेक्टर ०४ आर जमीन भोगदार दोन असलेली जमीन एक करून दलालाच्या घशात घातल्याचा आरोप करण्यात आला आहे.
तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार या जमिनीचा मोठा आर्थिक व्यवहार झाला असून दलालाने ही जमीन उत्खननासाठी ठेकेदाराला कोट्यवधी रुपयांत विक्री केल्याचेही सांगितले जात आहे.
या प्रकरणात फसवणूक झाल्याचा आरोप करत पीडित व्यक्तीने दि. १५ जानेवारी २०२६ रोजी पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली असून ॲट्रॉसिटी ॲक्ट व भारतीय दंड विधान कलम ४२० अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. मात्र अद्याप कारवाई न झाल्याचा आरोप तक्रारदारांनी केला आहे.
दरम्यान, सय्यद मुदस्सीर सय्यद जमीर (रा. डोंगरगाव) यांनी अन्यायाविरोधात दाद मागण्यासाठी दि. २७ जानेवारी २०२६ पासून तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे. या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करून पीडितांना न्याय देण्याची मागणी त्यांनी केली आहे.
तसेच, नायब तहसीलदार राणे यांच्या कार्यकाळात वर्ग २ जमिनी वर्ग १ मध्ये रूपांतर करून मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत असून अशा सर्व प्रकरणांची चौकशी करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
महागाव तहसीलमधील पूर्वीचे घोटाळे चर्चेत
महागाव तहसील कार्यालयात यापूर्वीही रॉकेल, साखर व धान्य घोटाळ्यांप्रकरणी अनेक तहसीलदारांवर कारवाई होऊन काहींना तुरुंगवास भोगावा लागल्याचे उदाहरणे आहेत. सध्या साखर घोटाळ्याचे प्रकरण प्रलंबित असल्याचेही सांगितले जात आहे.
जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी महागाव तहसील कार्यालयास अनेक वेळा पत्र पाठवूनही कारवाई न झाल्यामुळे संशय निर्माण होत असल्याचे दि. १५ सप्टेंबर २०२५ रोजी सामाजिक कार्यकर्ता अनंता उत्तमराव नागरगोजे यांना पत्राद्वारे कळविल्याचे सांगण्यात येते.



