नांदेड: ‘हिंद दी चादर’ सोहळ्यासाठी लाखो भाविकांची मांदियाळी; पोलीस प्रशासनसज्ज

(हिमायत नगर प्रतिनिधि शेख खयुम खूरेशी ):
नांदेडमध्ये आज आणि उद्या ‘हिंद दी चादर’ श्री गुरु तेग बहादूर जी यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त एका भव्य ऐतिहासिक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यासाठी देशभरातून सुमारे १० लाख भाविक नांदेडमध्ये दाखल होत असून, प्रशासनाने याची जय्यत तयारीकेली आहे.
नांदेडच्या ५२ एकर विस्तीर्ण मोदी मैदानावर हा भव्य कार्यक्रम पार पडत आहे. या सोहळ्याला राजकीय आणि धार्मिक क्षेत्रातील दिग्गज हजेरी लावणार आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंह सैनी यांच्यासह अनेक राज्यांचे मुख्यमंत्री आणि संत-महंत या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.
(पोलीस अधीक्षकांचे आवाहन):
गर्दीचे नियोजन करण्यासाठी नांदेडचे पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी विशेष सतर्कता बाळगली आहे. त्यांनी व्हिडिओद्वारे जनतेला आवाहन केले आहे की:
शहरातील वाहतुकीत करण्यात आलेल्या बदलांचे (ट्रॅफिक डायव्हर्जन) पालन करावे.
कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता शांतता राखावी.
पोलीस प्रशासनाला सहकार्य करून हा ऐतिहासिक सोहळा शिस्तबद्ध पद्धतीने साजरा करावा.
(विशेष सोयी-सुविधा):
भाविकांसाठी ८ प्रमुख ठिकाणी २४ तास लंगर (महाप्रसाद) सेवा सुरू आहे. तसेच निवास, आरोग्य आणि सुरक्षिततेसाठी २६ विविध समित्यांची स्थापना करण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाचा अल्पसंख्याक विभाग या कार्यक्रमाचे नियोजन करत असून, हा सोहळा सामाजिक सलोख्याचे प्रतीक ठरणार आहे.



