शहर

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या यवतमाळ जिल्ह्यातील परीक्षा सुरळीत सुरू

सहसंपादक शेख मुजाहिद

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या हिवाळी परीक्षा अमरावती विभागात यवतमाळ जिल्ह्यातील सर्व परीक्षा केंद्रावर शांत, शिस्तबद्ध व विद्यापीठाच्या नियमांनुसार सुरळीत सुरू आहेत. अकोला, अमरावती, वाशीम, बुलढाणा व यवतमाळ या पाच जिल्ह्यांतील एकूण ३४ परीक्षा केंद्रांचा समावेश आहे.यवतमाळ जिल्ह्यात एकूण १० परीक्षा केंद्रे आहेत दारव्हा , दिग्रस , पुसद येथील परीक्षा केंद्रावर डॉ वडते यांनी भेट दिली असता परीक्षा नियोजनबद्ध व शांततेत सुरू असल्याचे समाधान व्यक्त केले.

बी.ए., बी.कॉम., बी.एस्सी., एम.ए., एम.कॉम., एम.एस्सी., बी.लिब., शिक्षणशास्त्र, पत्रकारिता आदी अभ्यासक्रमांसाठी नवीन शैक्षणिक धोरणानुसार सत्र पद्धतीतील तसेच पुनःपरीक्षार्थी मिळून एकूण २१,४०५ विद्यार्थी परीक्षा देत आहेत.

या परीक्षेचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे विभागातील काही संवेदनशील केंद्रांवर प्रथमच ‘बसते पथक’ नियुक्त करण्यात आले आहे. या पथकातील सदस्य परीक्षा कालावधीत सलग तीन तास परीक्षा केंद्रावर उपस्थित राहून परीक्षा शिस्तबद्ध वातावरणात पार पडावी, यासाठी सक्रिय भूमिका बजावत आहेत.
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे माजी परीक्षा नियंत्रक असलेले डॉ. जयंत वडते यांची यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या अमरावती विभागीय संचालकपदी नियुक्ती झाल्यानंतर त्यांच्या कार्यकाळात प्रथमच अशा प्रभावी उपाययोजना राबविण्यात आल्या आहेत. त्यामुळे परीक्षा प्रक्रियेत पारदर्शकता वाढली असून विद्यार्थ्यांचा आत्मविश्वासही अधिक दृढ झाला आहे.

या संपूर्ण परीक्षा व्यवस्थेसाठी अमरावती विभागीय केंद्रातील अधिकारी व कर्मचारी, परीक्षा केंद्रांचे केंद्रचालक तसेच अंतर्गत व बाह्य पर्यवेक्षक यांनी समन्वयाने मेहनत घेतली आहे. विद्यापीठाचे कुलगुरू व प्र-कुलगुरू, विद्यार्थी कक्षाचे संचालक व परीक्षा नियंत्रक यांचे वेळोवेळी मार्गदर्शन लाभत असल्याने ५ ते २५ जानेवारीदरम्यान सुरू असलेल्या या हिवाळी परीक्षा शांत, सुरक्षित व दर्जेदार वातावरणात पार पडत आहेत.

चौकट

मुक्त विद्यापीठाच्या परीक्षेकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलावा

मुक्त विद्यापीठाच्या परीक्षांकडे आजही दुय्यम दृष्टिकोनातून पाहिले जाते, ही मानसिकता बदलण्याची गरज आहे. विद्यार्थीकेंद्रित दृष्टिकोन ठेवून परीक्षा पारदर्शक व शिस्तबद्ध राबवल्यास मुक्त विद्यापीठाच्या शिक्षण व्यवस्थेवरील विश्वास अधिक दृढ होतो. अमरावती विभागातील सध्याची परीक्षा प्रक्रिया हीच दिशा दाखवणारी ठरत असून मुक्त विद्यापीठाच्या परीक्षेकडे पाहण्याचा सामाजिक व प्रशासकीय दृष्टिकोन बदलण्याची वेळ आली आहे.
डॉ जयंत वडते
विभागीय संचालक (अमरावती)
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button