शहर

महागावात देशी दारू दुकान प्रकरण तापले; नगरसेवक व अधिकाऱ्यांच्या भूमिकेवर गंभीर संशय


महागाव प्रतिनिधी संजय नागरगोजे
महागाव नगरपंचायत हद्दीत देशी दारूचे दुकान सुरू झाल्याने शहरात खळबळ उडाली असून नागरिकांचा संताप अनावर झाला आहे. सहा महिन्यांपूर्वी नगरपंचायत नगरसेवकांनी ठराव रजिस्टरवर ठराव मंजूर करून दुकानासाठी एनओसी दिल्यामुळे हा वाद पेटला आहे. विशेष म्हणजे या ठरावाविरोधात नागरिकांनी आंदोलन करून तो रद्दही केला होता. मात्र पहिल्या ठरावाच्या आधारेच दुसऱ्या जिल्ह्यातून दुकान यवतमाळ जिल्ह्यात ट्रान्सफर करून सुरू करण्यात आले, हे नागरिकांच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखे असल्याचे बोलले जात आहे.
नगरसेवकांनी महागाववासीयांची उघड दिशाभूल करून ठराव मंजूर केला, असा गंभीर आरोप होत आहे. कोणत्या नगरसेवकांनी हा ठराव दिला, यांची नावे अद्याप पुढे येत नसल्याने संशय अधिक बळावत आहे. काही कर्मचाऱ्यांनी ठरावाबाबत माहिती उघड केल्याने प्रकरणाचा भांडाफोड झाल्याची चर्चा आहे.
दारूच्या दुकानासमोर महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचे थैलचित्र उभारलेले असताना त्या ठिकाणी एनओसी कशी देण्यात आली, हा प्रश्न प्रशासनासमोर उभा ठाकला आहे. दारूबंदी विभागाने पंचनामा करताना ही बाब का दुर्लक्षित केली? पंचनामा ‘सेटिंग’ करून करण्यात आल्याचा आरोपही नागरिकांनी केला असून ठराविक आर्थिक देवाणघेवाण झाल्याची चर्चा आहे.
आज 23 जानेवारी 2026 रोजी दुकानाचे पूजन करून प्रत्यक्ष विक्री सुरू करण्याची प्रक्रिया राबविण्यात आली. यावेळी नगरसेवक, दुकानदार व नागरिकांमध्ये जोरदार वाद झाला. परिस्थिती चिघळल्यास भविष्यात कायदा व सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
वार्ड क्रमांक दोनमधील महिलांनी व नागरिकांनी या दुकानाविरोधात थेट रस्त्यावर उतरण्याचा निर्धार केला असून न्यायालयात दाद मागण्याचा इशारा दिला आहे. जयश्री नरवाडे, सुरेश नरवाडे, डॉ. पंजाब राठोड, आत्माराम राठोड, दीपक आडे नरवाडे यांनी आंदोलनाचे नेतृत्व घेतले आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने दुकान कायमस्वरूपी बंद करण्यासाठी कायदेशीर लढा उभारण्याचा इशारा डॉ. पंजाब राठोड यांनी दिला आहे.
या प्रकरणामुळे महागाव नगरपंचायतच्या नगरसेवकांची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात सापडली असून प्रशासनाने तातडीने चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button