पोलीस पाटलांचे अस्तित्व धोक्यात; पोलिसांकडून अधिकृत प्रतिनिधीला ‘खो’ आणि तस्करांना ‘मान’!

महागाव प्रतिनिधी संजय नागरगोजे
ग्रामीण भागात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस विभागाचा अधिकृत प्रतिनिधी म्हणून पोलीस पाटील महत्त्वाची भूमिका बजावत असतो. गावातील कोणतीही शासकीय कारवाई, चौकशी किंवा तपास करताना पोलीस पाटलांना विश्वासात घेणे बंधनकारक असताना, महागाव परिसरात मात्र पोलीस कर्मचारीच या व्यवस्थेला डावलत असल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. इतकेच नव्हे तर अवैध व्यावसायिक व तस्करांच्या मदतीने कारभार चालवला जात असल्याचा गंभीर आरोप नागरिकांकडून होत आहे.
याचाच प्रत्यय आज हिवरा (संगम) येथे आला. २०१७ साली दूध दरवाढीच्या प्रश्नावर शेतकऱ्यांसाठी आंदोलन करणारे सामाजिक कार्यकर्ते अविनाश लक्ष्मण नरवाडे यांच्या जुन्या प्रकरणाच्या अनुषंगाने तपासासाठी गृह रक्षक दलाचे कर्मचारी अनिल शिंदे गावात दाखल झाले. नियमानुसार त्यांनी प्रथम गावचे पोलीस पाटील यांच्याशी संपर्क साधून त्यांना सोबत घेणे अपेक्षित होते. मात्र, त्यांनी पोलीस पाटलांना पूर्णतः डावलून चक्क एका अवैध रेती तस्कराशी संधान साधले.
सदर तस्करासोबत चहा-पाणी करून त्यालाच सोबतीला घेत अनिल शिंदे थेट अविनाश नरवाडे यांच्या घरी पोहोचले. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तीसह पोलीस कर्मचारी घरी आल्याचे पाहून नरवाडे कुटुंब हादरून गेले. या प्रकारामुळे घरात भीतीचे वातावरण निर्माण होऊन मानसिक तणाव व कौटुंबिक अस्वस्थता निर्माण झाल्याचे सांगण्यात येत आहे.
या घटनेनंतर संतप्त झालेल्या अविनाश नरवाडे यांनी संबंधित कर्मचाऱ्याला जाब विचारत, “गावात पोलीस पाटील असताना तुम्ही अवैध व्यावसायिकांना सोबत घेऊन का फिरत आहात? मग पोलीस पाटलांचे नेमके काम काय?” असा रोखठोक सवाल केला. शासनाकडून मानधन घेणाऱ्या आणि गावाचा अधिकृत प्रतिनिधी असलेल्या पोलीस पाटलांनाच जर पोलीस कर्मचारी जुमानत नसतील, तर सामान्य नागरिकांनी न्यायासाठी कुणाकडे धाव घ्यावी, असा गंभीर प्रश्न आता उपस्थित झाला आहे.
या प्रकरणामुळे पोलीस प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, कर्तव्यात कसूर करणाऱ्या व तस्करांशी सलगी ठेवल्याचा आरोप असलेल्या गृह रक्षक दलाचे कर्मचारी अनिल शिंदे यांच्यावर वरिष्ठ अधिकारी काय कारवाई करणार, याकडे महागाव तालुक्यातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.



