Uncategorized

अतिवृष्टीतील फळबाग नुकसानीकडे कृषी विभागाचे चार महिने दुर्लक्ष; तक्रार व वृत्तांकनानंतरच पाहणी


महागाव प्रतिनिधी : संजय नागरगोजे
महागाव तालुक्यात आगस्ट–सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेती पिकांसह फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. या पार्श्वभूमीवर शासनाने तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश तलाठी व कृषी सहाय्यकांना दिले होते. मात्र वाकान येथील शेतकरी उत्तम पांडुरंग राठोड यांच्या फळबागेचे मोठे नुकसान होऊनही तब्बल चार महिने कृषी विभागाने कोणतीही दखल घेतली नाही, असा गंभीर आरोप होत आहे.
अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे वेळेत न झाल्याने शेतकरी उत्तम राठोड यांना अनुदानापासून वंचित राहावे लागले. वारंवार पाठपुरावा करूनही संबंधित कृषी अधिकारी व महसूल कर्मचारी हजर नसल्याने शेतकऱ्याला कोणतीही सहानुभूती मिळत नसल्याचे चित्र तालुक्यात दिसून येत आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे कृषी विभागाचा गलथान कारभार उघडकीस आला आहे.
अखेर नुकसानभरपाई न मिळाल्याने शेतकरी उत्तम राठोड यांनी तहसील कार्यालयात लेखी तक्रार सादर केली. तसेच वृत्तपत्रातून कृषी व महसूल विभागाच्या हलगर्जीपणाकडे लक्ष वेधण्यात आल्यानंतर बुधवारी (दि. २१ जानेवारी) संबंधित महसूल व कृषी अधिकाऱ्यांना जाग आली. अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष शेतावर जाऊन फळबागेची पाहणी केली.
पाहणीदरम्यान फळबागेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे स्पष्ट आढळून आले. याबाबत सकारात्मक अहवाल शासनाकडे पाठवून तहसीलदारांच्या निदर्शनास आणून देण्यात येईल तसेच संबंधित शेतकऱ्याला नुकसानभरपाई मिळवून देण्याचे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले.
या पाहणीवेळी कृषी अधिकारी फाळके साहेब, कृषी सहाय्यक माने, कृषी अधिकारी एन. आर. पाईकराव, सरपंच आश्वजित भगत, उपसरपंच परेश राठोड, महसूल सेवक शरद वंजारे तसेच शेतकरी उत्तम पांडुरंग राठोड उपस्थित होते.
चार महिन्यांच्या विलंबानंतर झालेल्या या पाहणीमुळे कृषी विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, शेतकऱ्यांना वेळेवर न्याय मिळणार का, असा सवाल तालुक्यातील शेतकरी वर्गातून उपस्थित केला जात आहे. अनुदान मिळेल की नाही याची शंकाच आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button