उमरखेड नगरपरिषदेत सत्तास्थापनेपूर्वीच मतभेद; उपाध्यक्ष व स्वीकृत सदस्य पदांवरून चर्चांना उधाण

सहसंपादक शेख मुजाहिद
उमरखेड नगरपरिषद निवडणुकीत काँग्रेस, शिवसेना (उबाठा) व अॅड. संतोष जैन यांच्या विदर्भ–मराठवाडा विकास आघाडी प्रणित जनशक्ती पॅनलने स्पष्ट बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली असली, तरी उपाध्यक्ष व स्वीकृत सदस्य पदांच्या निवडीपूर्वीच सत्ताधारी गटात मतभेद असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
नगराध्यक्षपदी सौ. तेजश्री जैन यांची निवड झाली असून जनशक्ती पॅनलचे १७ नगरसेवक विजयी झाले आहेत. उपाध्यक्ष व दोन स्वीकृत सदस्य पदांची निवड आज दि. १६ जानेवारी २०२६ रोजी होणार असून, या पार्श्वभूमीवर विविध नावे चर्चेत आहेत.
सूत्रांनुसार, काँग्रेसचे गोपाल अग्रवाल व विदर्भ–मराठवाडा विकास आघाडीचे बाळासाहेब नाईक यांची स्वीकृत सदस्यपदी नियुक्ती होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र काँग्रेसच्या काही नगरसेवकांमध्ये याबाबत असमाधान असल्याची चर्चा आहे. काँग्रेसचे १२ नगरसेवक निवडून आल्याने स्वीकृत सदस्यांमध्ये समतोल प्रतिनिधित्व असावे, अशी भूमिका काही गोटांतून मांडली जात आहे.
उपाध्यक्षपदासाठी अद्याप अधिकृत नाव जाहीर झालेले नसले, तरी समाजाच्या पाठिंब्याच्या पार्श्वभूमीवर साजीद जागीरदार, काँग्रेसकडून अनुभवी नगरसेवक रसूल पटेल तसेच आदिवासी समाजाचे प्रतिनिधित्व लक्षात घेता शिकारे सर यांची नावे चर्चेत आहेत.
दरम्यान, सत्ताधारी गटातील या चर्चांकडे विरोधी पक्ष भाजप लक्ष ठेवून असल्याचे बोलले जात आहे. भाजपकडूनही स्वीकृत सदस्य व उपाध्यक्ष पदाबाबत हालचाली सुरू असल्याची चर्चा आहे.
*बॉक्स*
राजकीय विश्लेषण | स्पष्ट बहुमतातही एकमताचे आव्हान
राजकीय जाणकारांच्या मते, ही स्थिती केवळ पदवाटपापुरती मर्यादित नसून सत्तेतील समतोल व सामाजिक समीकरणांशी जोडलेली आहे. काँग्रेस, आघाडी व मित्र पक्ष यांच्यात योग्य समन्वय साधला गेला नाही, तर सुरुवातीलाच निर्माण झालेली अस्वस्थता पुढील पाच वर्षे कारभारासाठी अडचणीची ठरू शकते. याच अंतर्गत मतभेदांचा फायदा विरोधी पक्ष घेऊ शकतो, असेही मत व्यक्त केले जात आहे.



