खेडी (वालतुर) येथे तरुणाचा गळफास घेऊन मृत्यू; दराटी पोलिसांत मर्ग नोंद

सहसंपादक शेख मुजाहिद
मरखेड तालुक्यातील खेडी (वालतुर) येथे 35 वर्षीय तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी (दि. 16 जानेवारी) सकाळी उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून कुटुंबीयांवर शोककळा पसरली आहे.
मयताचे नाव अरविंद बाबुलाल चव्हाण (वय 35, जात बंजारा, रा. खेडी-वालतुर, ता. उमरखेड, जि. यवतमाळ) असे आहे. या प्रकरणी फिर्यादी रामराव देवराव मुडे (वय 39, रा. चिखली) यांनी दराटी पोलिस ठाण्यात जबानी रिपोर्ट दिला आहे.
फिर्यादीनुसार, गुरुवारी सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास श्याम नारायण चव्हाण यांनी फोनद्वारे अरविंदने आत्महत्या केल्याची माहिती दिली. त्यानंतर फिर्यादी तात्काळ घटनास्थळी पोहोचले असता, अरविंद हा घरातील देव्हाऱ्याच्या खोलीत स्लॅबच्या लोखंडी कडीला नायलॉन दोरीने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. त्याच्या शरीरात कोणतीही हालचाल दिसून येत नव्हती.
या घटनेबाबत कुटुंबीयांनी कोणावरही संशय व्यक्त केलेला नाही. मिळालेल्या माहितीनुसार, दराटी पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून मर्गची नोंद घेतली असून पुढील तपास सुरू आहे. शवविच्छेदनानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.
दरम्यान, या दुर्दैवी घटनेने खेडी (वालतुर) परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून आत्महत्येच्या कारणांचा शोध घेण्याची मागणी होत आहे.



