आदर्श गाव पिंपळदरीत बाळेराज महाराज पालखी सोहळा उत्साहात

- खासदार नागेश पाटील आष्टीकर यांची उपस्थिती, मंदिर सभागृहासाठी १५ लाखांचा निधी जाहीर
सहसंपादक शेख मुजाहिद
उमरखेड :-
आदर्श गाव पिंपळदरी येथे गेल्या अनेक वर्षांपासून परंपरेने सुरू असलेल्या बाळेराज महाराज पालखी सोहळ्याचा यात्रा महोत्सव यावर्षी मोठ्या भक्तिभावात व उत्साहात साजरा करण्यात आला. या धार्मिक सोहळ्याला हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी उपस्थिती लावून बाळेराज महाराजांचे दर्शन घेतले व उपस्थित भाविकांना संबोधित केले.
यावेळी बोलताना खासदार आष्टीकर म्हणाले, “मी निवडणूक काळात पिंपळदरी गावात आलो नव्हतो, तरीही गावकऱ्यांनी मला भरभरून मतदानरूपी आशीर्वाद दिला. हे ऋण मी कधीही विसरणार नाही. गावात प्रथम येण्याचे भाग्य मला आज लाभले,” असे त्यांनी भावनिक शब्दांत सांगितले.
खासदार आष्टीकर यांनी बाळेराज महाराजांचे दर्शन घेऊन मंदिर परिसराची पाहणी केली. यावेळी त्यांनी मंदिर सभागृह उभारणीसाठी १५ लाख रुपयांचा निधी जाहीर करत मार्च महिन्याच्या अखेरीस हा निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन ग्रामस्थांना दिले.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात पिंपळदरीचे सरपंच बंडू ढाकरे यांनी इसापूर धरणाच्या पाण्याचा प्रश्न उपस्थित करत, धरणाच्या डाव्या कालव्याचे पाणी गावाला मिळाल्यास पिंपळदरीच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळेल, असे सांगून खासदारांनी यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी केली. यावर प्रतिसाद देताना खासदार आष्टीकर यांनी आठ दिवसांत संबंधित विभागाची बैठक घेऊन हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले.
दरम्यान, जिल्हा परिषद अर्थ व बांधकाम सभापती राम देवसरकर यांनी आपल्या भाषणात देशात वाढत असलेल्या सामाजिक व धार्मिक ध्रुवीकरणावर भाष्य करत, “सर्वधर्मसमभावाचे प्रतीक असलेल्या बाळेराज महाराजांसारख्या देवस्थानांची आज अधिक गरज आहे. अशा परंपरांमुळे सामाजिक व जातीय सलोखा टिकून राहतो,” असे सांगत शांततेत पालखी सोहळा साजरा करणाऱ्या गावकऱ्यांचे कौतुक केले.
यात्रेनिमित्त आयोजित कार्यक्रमात जिल्हा परिषद अर्थ व बांधकाम सभापती तातूभाऊ देशमुख, जिल्हा परिषद सदस्य चितांगराव कदम, देविदास खोकले, शंकर तालनकर, पंचायत समिती सदस्य रामराव जामकर यांनी आपले विचार व्यक्त केले. तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती मंचकराव चव्हाण, उबाठा तालुका प्रमुख सतीश नाईक, नितीन शिंदे, शिवसेना सचिव संतोष जाधव, मुन्नाभाऊ रहीदासनी यांच्यासह मोठ्या संख्येने राजकीय पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.
पिंपळदरी येथील बाळेराज महाराज हे जागृत देवस्थान म्हणून ओळखले जाते. येथे हिंदू-मुस्लिम समाजातील नागरिक श्रद्धेने नतमस्तक होतात. दरवर्षी येथे मोठ्या उत्साहात यात्रा महोत्सव साजरा केला जातो. यात्रेदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोफाळी पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक शिंदे, मुळावा बिट जमादार देविदास आठवले व संदीप शेरे यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुरेश तांबारे यांनी केले तर आभार संदेश कांबळे यांनी मानले.



