मुळाव्यात उभरणार छत्रपती संभाजी महाराज विचारभवन

- खासदार नागेश पाटील आष्टीकर यांचे २० लाखांपर्यंत निधीचे आश्वासन
सहसंपादक शेख मुजाहिद
मुळावा ग्रामपंचायतीने कन्या शाळेच्या पूर्व दिशेस सुमारे १२ वर्षांपूर्वी दिलेल्या जागेवर भव्य छत्रपती संभाजी महाराज विचारभवन उभारण्याचा निर्धार आता प्रत्यक्षात येण्याच्या मार्गावर आहे. या विचारभवनाच्या माध्यमातून सर्व जाती-धर्मातील विद्यार्थ्यांसाठी आधुनिक अभ्यासिका उपलब्ध करून देण्याचा संकल्प सामाजिक कार्यकर्त्यांनी केला आहे.
या विचारभवनात स्पर्धात्मक परीक्षा तसेच शालेय परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शांत, प्रेरणादायी व शैक्षणिक वातावरण निर्माण करण्यात येणार असून मुळावा तसेच परिसरातील गावांतील विद्यार्थ्यांना याचा मोठा लाभ होणार आहे.
दरम्यान, आज पिंपळदरी येथील यात्रेच्या निमित्ताने हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांची भेट घेऊन विचारभवनाच्या निर्मितीची गरज आणि उद्देश सविस्तरपणे मांडण्यात आला. या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत खासदार आष्टीकर यांनी आपल्या खासदार निधीतून १५ ते २० लाख रुपयांची मदत देण्याचे तसेच डीपीडीसीमधूनही आवश्यक सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
या निर्णयामुळे मुळावा परिसरातील शैक्षणिक चळवळीला मोठे बळ मिळाले असून ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. आता या विचारभवनाच्या उभारणीसाठी गावातील नागरिक, शिक्षणप्रेमी व सामाजिक कार्यकर्त्यांनी पुढे येऊन या चळवळीत सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
दरम्यान, छत्रपती संभाजी महाराज विचारभवन समिती, मुळावा यांच्या वतीने याबाबतचे अधिकृत निवेदन खासदार नागेश पाटील आष्टीकर यांना सादर करण्यात आले.



