उमरखेड शहरात नळफुटीमुळे रस्त्यावर पाण्याचे तळे; प्रशासनाच्या निष्क्रियतेवर संताप

- आपणा हॉटेल परिसरातील प्रकारामुळे वाहतूक ठप्प; अपघाताचा धोका वाढला, नागरिकांचा थेट सवाल- “जबाबदार कोण?”
उमरखेड शहरातील आपणा हॉटेल परिसरात काल रात्री अचानक झालेल्या नळफुटीमुळे नालीतील पाणी थेट मुख्य रस्त्यावर साचल्याने नागरिकांचे मोठे हाल सुरू झाले आहेत. रस्त्यावर पाणी साचल्यामुळे मोठमोठे खड्डे निर्माण झाले असून दुचाकी, चारचाकी वाहनचालकांसह पादचाऱ्यांनाही जीव मुठीत घेऊन मार्गक्रमण करावे लागत आहे.
या घटनेमुळे परिसरातील वाहतूक विस्कळीत झाली असून अपघाताचा धोका मोठ्या प्रमाणात वाढला आहे. रात्रीच्या सुमारास प्रकाशअभावी रस्त्यावरील खड्डे लक्षात न आल्याने वाहनचालक घसरत असल्याच्या घटनाही घडल्या आहेत. विशेष म्हणजे इतका गंभीर प्रकार घडूनही नगरपरिषद व पाणीपुरवठा विभागाकडून अद्याप कोणतीही तात्काळ दुरुस्ती अथवा प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात आलेली दिसून येत नाही.
नागरिकांमध्ये यामुळे तीव्र संताप व्यक्त होत असून,
नळाची नियमित देखभाल झाली होती का?
नालीतील पाणी थेट रस्त्यावर येईल अशी निष्काळजी व्यवस्था का करण्यात आली?
या नळफुटीस जबाबदार नेमके कोण?
असे थेट प्रश्न प्रशासनाला विचारले जात आहेत.
“एखादी मोठी दुर्घटना घडल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार?” असा संतप्त सवाल स्थानिक नागरिकांकडून उपस्थित करण्यात येत आहे. प्रशासनाने तातडीने घटनास्थळी पाहणी करून नळफुटीची दुरुस्ती करावी, दोषींवर कठोर कारवाई करावी व भविष्यात असे प्रकार घडू नयेत यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी जोरदार मागणी नागरिकांतून होत आहे.
प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे सामान्य नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत असून, आता तरी नगरपरिषद व पाणीपुरवठा विभाग जागा होणार का, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.



