उमरखेड : पळशी–शेंबाळपिपरी मार्गावर अवैध देशी दारूची उघड विक्री उघड

- उपशीर्षक : रिकाम्या बॉटल्स बोलक्या; प्रशासनाला दिसत नाही का अवैध विक्री?
सहसंपादक शेख मुजाहिद
उमरखेड तालुक्यातील पोफाळी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या पळशी फाटा ते शेंबाळपिपरी मार्गावर काही ठिकाणी उघडपणे अवैध देशी दारूची विक्री सुरू असल्याचे गंभीर वास्तव समोर आले आहे. या मार्गावरील विविध ठिकाणी उभारलेल्या टिनशेडमध्ये देशी दारूची विक्री होत असल्याचे चित्र दिसून येत असून, संबंधित ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पडलेल्या रिकाम्या देशी दारूच्या बॉटल्स व बॉक्सच्या खचामुळे ही बाब अधिक ठळकपणे समोर आली आहे.
पळशी फाटा, हातला फाटा तसेच पिंपळदरी फाटा परिसरात पाहणी केली असता रस्त्यालगत टिनशेड, कॅनॉललगतची शेड, सिमेंटच्या टाक्यांत साठवलेला बॉटल कचरा तसेच वापर करून स्वच्छ केलेली शेड आढळून आली. या दृश्यावरून येथे केवळ तुरळक नव्हे, तर दीर्घकाळापासून आणि मोठ्या प्रमाणावर देशी दारूची विक्री सुरू असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
पोफाळी पोलीस स्टेशनपासून अवघ्या दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या हातला फाटा परिसरातच अशा स्वरूपाची विक्री सुरू असल्याचे चित्र समोर येत असल्याने, संबंधित पोलीस यंत्रणा तसेच उपविभागीय पातळीवरील अधिकाऱ्यांच्या भूमिकेबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. इतक्या उघड स्वरूपात पुरावे उपलब्ध असताना याबाबत कोणती तपासणी किंवा कारवाई झाली आहे का, याबाबत नागरिकांमध्ये चर्चा सुरू आहे.
या प्रकरणातील सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे परवाना नसताना इतक्या मोठ्या प्रमाणावर देशी दारूचा साठा येतो कुठून? हा माल कोण पुरवतो, कोणत्या मार्गाने वाहतूक होते आणि ही विक्री साखळी किती मोठी आहे, याची सखोल चौकशी होणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले जात आहे. केवळ विक्रेत्यांपुरती कारवाई न करता पुरवठ्याच्या मूळावर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी पुढे येत आहे.
चौकट
दारू उत्पादन शुल्क विभागाची जबाबदारी काय?
अवैध दारू उत्पादन व विक्रीवर नियंत्रण ठेवण्यासाठी दारू उत्पादन शुल्क विभाग कार्यरत आहे. मात्र, या परिसरात उघडपणे सुरू असलेल्या देशी दारूच्या विक्रीबाबत या विभागाकडून कोणती तपासणी, धाड किंवा कारवाई करण्यात आली आहे का, माल कोठून येतो याच आजपर्यंत कधी चौकशी करण्याची तसदी संबंधित विभागाने केली का ? असा प्रश्न उपस्थित होत आहे. प्रभावी कारवाईची अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
*चौकट*
संशयित अवैध दारू विक्रीची ठिकाणे
पळशी फाटा – रस्त्याच्या दोन्ही बाजूंना टिनशेड
हातला फाटा – कॅनॉललगत असलेले शेड व रिकामे बॉक्स
पिंपळदरी फाटा – दोन ठिकाणी संशयित विक्री
पळशी फाटा – सिमेंटच्या टाक्यात बॉटल्सचा खच
पिंपळदरी फाटा – वापर करून स्वच्छ केलेले शेड



