महावितरणच्या शॉर्टसर्किटमुळे चार एकर ऊस जळाला

- शेतकऱ्याचे पाच लाखाचे नुकसान
सहसंपादक शेख मुजाहिद
उमरखेड:-महावितरणच्या निष्काळजीपणामुळे पोफाळी (ता. उमरखेड) येथील शेतकऱ्याचा तोडणीला आलेला ऊस आगीत जळून खाक झाल्याची गंभीर घटना समोर आली असून, याप्रकरणी शेतकऱ्याने पोलीस स्टेशन पोफाळी येथे जबानी रिपोर्ट दाखल केला आहे.
पोफाळी येथील रहिवासी दिपक नारायण कवाने (वय ३७, व्यवसाय – शेती) यांनी दि. १६ जानेवारी २०२६ रोजी पोलीस ठाण्यात हजर राहून दिलेल्या जबानी रिपोर्टनुसार, वसंतनगर शेतशिवारातील शेत सर्वे क्रमांक 38/1/अ मध्ये त्यांची एकूण पाच एकर शेती आहे. यापैकी चार एकर क्षेत्रात ऊसाचे पीक घेतले असून तो ऊस तोडणीला आलेला होता. सदर शेतातून महावितरणचे विद्युत खांब व विद्युत तारा गेलेल्या आहेत.
दि. १६ जानेवारी २०२६ रोजी सकाळी सुमारे १० वाजता शेतात कामासाठी गेले असता, संबंधित चार एकर शेतातील ऊसाचे पीक विद्युत शॉर्टसर्किटमुळे जळून खाक झाल्याचे दिसून आले. याच घटनेत शेतातील एक स्प्रिंकलर सेट देखील जळून नुकसान झाल्याचे त्यांनी नमूद केले आहे. आगीमुळे झालेल्या नुकसानीची नेमकी किंमत तत्काळ सांगता येत नसल्याचेही जबानी रिपोर्टमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे.
महावितरणच्या विद्युत लाईनमधील बिघाडामुळेच ही दुर्घटना घडल्याचा आरोप शेतकऱ्याने केला असून, या घटनेमुळे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. शेतकऱ्याच्या तक्रारीनंतर पोफाळी पोलीस ठाण्यात घटनेची नोंद घेण्यात आली असून, पुढील चौकशी व पंचनाम्याची मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.
या घटनेमुळे ग्रामीण भागातील विद्युत व्यवस्थेतील दुर्लक्ष पुन्हा एकदा उघड झाले असून, महावितरणने जबाबदारी स्वीकारून तातडीने नुकसानभरपाई द्यावी, अशी जोरदार मागणी परिसरातील शेतकऱ्यांकडून होत आहे.



