उमरखेडमध्ये सोनार सावधान! सोन्याचे पान बदलून फसवणूक; महिला ग्राहकाकडून चोरी

महागाव प्रतिनिधी संजय नागरगोजे
उमरखेड शहरात सोनार व्यावसायिकांना सावधान राहण्याचा इशारा देणारी घटना समोर आली आहे. उमरखेड येथील सुधाकर शहाणे यांच्या सोनार दुकानात आज एका अज्ञात महिलेने सोन्याचे पान बदलून फसवणूक केल्याची घटना घडली असून, यात दुकानमालकाचे सुमारे ७ हजार ५०० रुपयांचे नुकसान झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित महिला ग्राहक सोन्याचे पान खरेदी करण्याच्या बहाण्याने दुकानात आली. तिने “सोन्याचे पान पाण्यात दाखवा” अशी मागणी केली. दुकानदाराने पान तपासणीसाठी बाहेर काढताच, महिलेने चलाखीने एक सोन्याचे पान उचलून त्याजागी बनावट पान ठेवले. गडबडीत तिने बेल्ट क्रमांकाचे पानही दुकानातच विसरून टाकले, त्यामुळे फसवणूक उघडकीस आली.
दुर्दैवाने, संबंधित महिला तोंड झाकून (ओढणी/मास्क) आल्यामुळे तिचा चेहरा स्पष्टपणे ओळखू येत नाही, त्यामुळे ओळख पटविण्यात अडचण येत आहे. या प्रकरणात दुकानमालकाला मोठा आर्थिक फटका बसला असून परिसरातील सोनार व्यावसायिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
या घटनेनंतर उमरखेडमधील सर्व सोनार व्यावसायिकांनी अशा संशयास्पद ग्राहकांपासून सावध राहावे, तसेच
सोन्याचे दागिने किंवा पाने एकावेळी कमी प्रमाणातच दाखवावीत,
सीसीटीव्ही कॅमेरे कार्यरत ठेवावेत,
आणि संशयास्पद हालचाली दिसताच तत्काळ पोलिसांना माहिती द्यावी,
असा सल्ला दिला जात आहे.
या घटनेमुळे शहरात सोन्याचे पान बदलून फसवणूक करणारी टोळी सक्रिय असल्याचा संशय व्यक्त केला जात असून, पोलिसांनी याबाबत गंभीर दखल घ्यावी, अशी मागणी व्यावसायिकांकडून होत आहे.



