Uncategorized

वनभोजनाच्या’ निमंत्रणाने प्रशासनाला फुटला घाम; पुस नदीवरील पुलाला अखेर मिळाले ‘संरक्षक कवच’


महागाव | प्रतिनिधी : संजय नागरगोजे
प्रशासनाचे कान टोचण्यासाठी कधी कधी तक्रारींपेक्षा ‘आग्रहाचे निमंत्रण’ अधिक प्रभावी ठरते, याचा प्रत्यय यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुक्यात आला आहे. हिवरा (संगम) येथील पुस नदीवरील पुलाच्या दुरवस्थेबाबत तरुण सामाजिक कार्यकर्ते हरीश कामारकर यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांना दिलेल्या ‘वनभोजनाच्या’ निमंत्रणाची बातमी सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाली आणि दीर्घकाळ सुस्त असलेली प्रशासकीय यंत्रणा अचानक खडबडून जागी झाली.
ज्या पुलाकडे स्थानिक प्रशासन महिनोन्‌महिने दुर्लक्ष करत होते, त्या पुलावर सार्वजनिक बांधकाम विभागाने आता युद्धपातळीवर काम करत मजबूत संरक्षक कठडे बसवले आहेत. त्यामुळे या मार्गावरून दररोज प्रवास करणाऱ्या हजारो नागरिकांचा जीव अखेर सुरक्षित झाला आहे.
हिवरा (संगम) येथील पुस नदीवरील हा पूल गेल्या अनेक दिवसांपासून मृत्यूचा सापळा ठरला होता. पुलाचे संरक्षक कठडे तुटलेले, तसेच पथदिव्यांचा अभाव असल्याने येथे अनेक भीषण अपघात घडले असून काही नागरिकांना आपले प्राणही गमवावे लागले होते. वारंवार तक्रारी व मागण्या करूनही प्रशासनाने दखल न घेतल्याने हरीश कामारकर यांनी एक आगळीवेगळी व उपरोधिक शक्कल लढवली.
“नितीन गडकरी ज्या भागातून जाणार असतात, तिथे प्रशासन एका रात्रीत रस्ते चकाचक करते,” या लोकचर्चेचा आधार घेत त्यांनी गडकरींना पत्र लिहून शेतातील गावरान वनभोजनाचे निमंत्रण दिले.
“साहेब, तुम्ही जेवायला आलात तर तुमच्या स्वागतासाठी का होईना, पण हा रस्ता आणि पूल प्रशासन नक्कीच नीट करेल,” अशी मार्मिक व उपरोधिक साद त्यांनी या पत्रातून घातली होती.
हे पत्र राजकीय व प्रशासकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरताच सार्वजनिक बांधकाम विभागाची मोठी धावपळ उडाली. ही बाब मंत्री महोदयांच्या कानावर गेल्यास कारवाई होईल, या भीतीने विभागाने तातडीने काम सुरू केले आणि प्रलंबित असलेले संरक्षक कठड्यांचे काम अखेर पूर्ण केले.
एका सामान्य तरुणाने लढवलेल्या या कल्पक शक्कलेमुळे प्रशासकीय अनास्थेचा बांध फुटला आणि पुस नदीवरील पुलाचे ‘भाग्य’ उजळले. हरीश कामारकर यांच्या या धाडसी पुढाकारामुळे १० ते १५ खेड्यांचा दळणवळण संपर्क सुरक्षित झाला आहे.
या उल्लेखनीय कार्याबद्दल हिवरा (संगम) येथील ग्रामस्थ, दररोज जीव मुठीत धरून प्रवास करणारे प्रवासी तसेच संपूर्ण यवतमाळ जिल्ह्यातील नागरिकांकडून हरीश कामारकर यांचे विशेष आभार व्यक्त केले जात आहेत.
“केवळ तक्रारी करत बसण्याऐवजी व्यवस्थेला जागे करण्यासाठी उचललेले हे पाऊल प्रेरणादायी आहे,” अशा प्रतिक्रिया नागरिकांमधून उमटत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button