Uncategorized

तरोडा येथे जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

सहसंपादक शेख मुजाहिद
उमरखेड:-
तालुकास्तरीय खेळ व क्रीडा स्पर्धेत उल्लेखनीय यश संपादन केलेल्या जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, तरोडा तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, तरोडा तांडा येथील विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा राजमाता जिजाऊ जयंती व स्वामी विवेकानंद जयंतीचे औचित्य साधून ग्रामपंचायत तरोडा यांच्या वतीने उत्साहात संपन्न झाला.
हा कार्यक्रम सोमवार, दिनांक १२ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ११ वाजता जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, तरोडा येथे आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच सौ. वैशाली खंडाळे होत्या, तर प्रमुख पाहुणे म्हणून पोफाळी पोलीस स्टेशन चे पोलिस उपनिरीक्षक सुरेश शिंदे उपस्थित होते.
तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत शाळेच्या विद्यार्थ्यांनी कॅरम, योगासने, थाळीफेक, बुद्धिबळ, धावणे (रिले), नृत्य तसेच कब-बुल-बुल या विविध स्पर्धांमध्ये प्रथम व द्वितीय क्रमांक पटकावून घवघवीत यश संपादन केले. या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार, प्रमाणपत्र देऊन व अभिनंदनपर शब्दांनी सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमात डॉ. विठ्ठलराव चव्हाण, कपिल पाटील, उपसरपंच पंजाबराव ठाकरे, संदीप खंडाळे, अशोक भोरे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विजय खंडाळे, सुशील भोरे, दीपक खंडाळे, अमोल पाटील, रामा पावलबुदे, शांतवन धुळे, प्रवीण देवकर, यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच शाळा समितीचे पदाधिकारी, सर्व सदस्य, शिक्षकवृंद, पालक व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी मान्यवरांनी विद्यार्थ्यांचे मनापासून कौतुक करत छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री राजमाता जिजाऊ व युवाशक्तीचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद यांच्या विचारांचा आदर्श घेऊन विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबतच क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रातही सातत्याने प्रगती करावी, असे मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल ग्रामपंचायत तरोडा, शाळा व्यवस्थापन समिती व शिक्षकवृंद यांचे उपस्थित ग्रामस्थांनी अभिनंदन केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button