Uncategorized

सावित्रीबाईंनी महिलांना प्रगतीचा मार्ग दाखवला सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त शाळांमध्ये विविध उपक्रम


महागाव | प्रतिनिधी संजय नागरगोजे
दि. १ जानेवारी १८४८ रोजी सावित्रीबाई फुले यांनी महात्मा ज्योतिराव फुले यांच्या सहकार्याने पुण्यातील भिडे वाड्यात देशातील पहिली मुलींची शाळा सुरू केली. त्या काळात महिलांनी शिक्षण घेणे हा जणू धार्मिक गुन्हा मानला जात होता. अशा प्रतिकूल परिस्थितीत समाजाकडून होणारा त्रास सहन करून, कोणतीही भीती न बाळगता सावित्रीबाईंनी शिक्षणाचा दिवा पेटवला आणि महिलांना प्रगतीचा मार्ग दाखवला, असे प्रतिपादन यशोदा चवरे यांनी केले.
सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त स्थानिक सावित्रीबाई फुले कन्या विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय तसेच नवभारत प्राथमिक विद्यालय येथे आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. त्यांच्या कार्यामुळेच आज महिला जमिनीपासून ते आकाशापर्यंत सर्वच क्षेत्रात यशस्वीपणे वाटचाल करत आहेत, असेही त्यांनी नमूद केले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे व्यवस्थापक संभाजीराव नरवाडे होते. प्रमुख अतिथी म्हणून दिगंबरराव गाडबैले, देविदास गावंडे उपस्थित होते. विचारमंचावर प्राचार्य प्रतिभा मेश्राम, डॉ. प्रा. ज्योती झाल्टे, प्रा. दीपिका देसाई, प्रा. प्रणाली कदम, वर्षा ब्रह्मटेके, भारती पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी अनेक विद्यार्थिनींनी सावित्रीबाई फुले यांच्या वेशात मंचावर सहभाग घेतला, तर काही विद्यार्थिनींनी त्यांच्या जीवनकार्यावर प्रभावी भाषणे केली.
अध्यक्षीय भाषणात संभाजीराव नरवाडे म्हणाले, “मुलींच्या शिक्षणाचे महत्त्व ओळखून आम्ही १९९० साली या भागात पहिली मुलींची शाळा सुरू केली. आज हजारो मुली या शिक्षणाचा लाभ घेत आहेत. भविष्यातही मुलींच्या शिक्षणासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न करू.”
कार्यक्रमात सहभागी सर्व विद्यार्थिनींना ‘जिजाऊ सावित्रीच्या लेकी’ ही पुस्तके भेट देण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन अशोक शिरगुरवार यांनी केले तर गुणवंत शिवरकर यांनी आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button