गुप्तधनाच्या शोधात आलेल्या टोळीला गावकऱ्यांनी बदडले दहिसावळी शिवारात मध्यरात्री खोदकाम; महागाव तालुक्यात खळबळ

महागाव | प्रतिनिधी संजय नागरगोजे
महागाव तालुक्यातील दहिसावळी (ता. महागाव) येथे गुप्तधनाच्या शोधासाठी आलेल्या संशयित टोळीला गावकऱ्यांनी पकडून चांगलेच झोडपल्याची घटना समोर आली असून, या प्रकारामुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
ही घटना ५ जानेवारीच्या मध्यरात्री सुमारे १२ वाजताच्या सुमारास दहिसावळी येथील गावंडे यांच्या शेतशिवारात, उसाच्या शेतात घडली. काही बाहेरगावातील व्यक्ती संशयास्पद हालचाली करत पूजापाठ करताना व जमिनीत खड्डे खोदताना ग्रामस्थांच्या निदर्शनास आल्या.
ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली असता, तेथे पूजेचे साहित्य, खोदकामासाठी लागणारी अवजारे व इतर साहित्य आढळून आले. संशय बळावल्याने ग्रामस्थांनी संबंधित व्यक्तींना पकडून त्यांचे छायाचित्रे काढली व जाब विचारला, त्यानंतर संतप्त ग्रामस्थांनी त्यांना चांगलेच बदडल्याची चर्चा आहे.
विशेष बाब म्हणजे, यापूर्वीही महागाव तालुक्यातील गोरख येथे एका घरात गुप्तधन काढण्याचा प्रयत्न करताना महागाव पोलिसांनी कारवाई केल्याची घटना घडली होती. त्यामुळे तालुक्यात गुप्तधनाच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्या टोळ्यांचा सुळसुळाट वाढत असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, माहूर परिसरालगत येणाऱ्या महागाव तालुक्यातील शेतशिवारात संध्याकाळच्या वेळेस बाहेरगावातील संशयित व्यक्ती येऊन पूजा, मंत्रतंत्र व खोदकाम करत असल्याचे प्रकार वाढत असल्याचे नागरिक सांगत आहेत.
या घटनेनंतर महागाव परिसरात या विषयावर जोरदार चर्चा सुरू असून, या प्रकरणात पोलिसांत अधिकृत तक्रार दाखल करण्यात आलेली नाही, हे विशेष मानले जात आहे. तक्रार नोंद न झाल्याने अशा घटनांना आळा कसा बसेल, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
गुप्तधनाच्या आमिषाने शेतकऱ्यांची व ग्रामीण भागातील नागरिकांची फसवणूक होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने, पोलिस प्रशासनाने अशा संशयास्पद हालचालींवर कडक नजर ठेवण्याची मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.



