Uncategorized

महागाव तालुक्यात विशेष कुष्ठरोग शोध मोहिमेत २२ रुग्ण आढळले ४२२ संशयितांची तपासणी; उपचार व प्रतिबंधात्मक औषधोपचार सुरू


महागाव | प्रतिनिधी संजय नागरगोजे
केंद्र सरकारने सन २०२७ पर्यंत देश कुष्ठरोगमुक्त करण्याचे उद्दिष्ट निश्चित केले असून, त्या पार्श्वभूमीवर यवतमाळ जिल्ह्यात विशेष कुष्ठरोग शोध मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत महागाव तालुक्यात प्रशिक्षित आरोग्य कर्मचाऱ्यांनी चालवलेल्या विशेष अभियानात २२ कुष्ठरोगी रुग्ण आढळून आले आहेत.
यवतमाळ जिल्ह्याचे सहाय्यक संचालक (आरोग्य सेवा) यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच डॉ. गोपाल पाटील यांच्या नेतृत्वाखाली महागाव तहसीलमध्ये ही विशेष कुष्ठरोग शोध मोहीम यशस्वीपणे राबविण्यात आली.
या मोहिमेदरम्यान तालुक्यातील विविध गावांमध्ये सूक्ष्म कार्ययोजना तयार करून घरोघरी जाऊन तपासणी करण्यात आली. प्रत्येक कुटुंबातील सदस्यांची तपासणी करून एकूण ४२२ संशयित रुग्णांची सखोल चौकशी व निरीक्षण करण्यात आले. या तपासणीतून २२ रुग्णांमध्ये कुष्ठरोगाची लक्षणे निश्चित झाली.
आढळून आलेल्या सर्व रुग्णांवर तात्काळ उपचार सुरू करण्यात आले असून, त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनाही प्रतिबंधात्मक औषधे देण्यात आली आहेत. आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे की, कुष्ठरोगाचा वेळेत निदान व उपचार झाल्यास हा आजार पूर्णपणे बरा होऊ शकतो.
आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की,
त्वचेवर बधिरपणा, पांढरे डाग, सुन्नपणा, जखमा न भरणे अशी लक्षणे आढळल्यास तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व लपवाछपवी न करता तपासणी करून घ्यावी.
दरम्यान, काही मजूर रोजगारासाठी बाहेरगावी गेल्याने त्यांचीही तपासणी व नमुने घेणे आवश्यक असल्याचे आरोग्य विभागाने नमूद केले आहे. त्यामुळे येत्या काळात महागाव तालुक्यात कुष्ठरोग शोध मोहीम अधिक गतीने व व्यापक स्वरूपात राबविण्याची गरज व्यक्त करण्यात येत आहे.
आरोग्य तज्ज्ञांच्या मते, पूर्वीच काळजी व नियमित तपासणी झाली असती तर रुग्णसंख्या रोखता आली असती, मात्र सध्याची मोहीम ही योग्य दिशेने टाकलेले महत्त्वाचे पाऊल असल्याचे सांगण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button