पोहंडूळ येथे बाहेरगावच्या व्यक्तींनी दंगा, छेडछाड व मारहाण नऊ आरोपींविरुद्ध गंभीर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू

महागाव : प्रतिनिधी संजय नागरगोजे
महागाव तालुक्यातील पोहंडूळ गावात बाहेरगावच्या नऊ व्यक्तींनी गावात घुसून दंगा घडवून आणत छेडछाड व मारहाण केल्याची गंभीर घटना उघडकीस आली आहे. या घटनेत काही नागरिकांना गंभीर दुखापत होऊन फ्रॅक्चर झाल्याची माहिती समोर आली आहे.
या प्रकरणी परवीन चिराग अरबी यांनी ३१ डिसेंबर २०२५ रोजी महागाव पोलीस स्टेशन येथे प्रत्यक्ष हजर राहून लेखी तक्रार दाखल केली आहे. तक्रारीत नऊ आरोपींची नावे नमूद असून, जखमींचे यवतमाळ येथील वैद्यकीय अहवाल (मेडिकल रिपोर्ट) पोलिसांकडे सादर करण्यात आले आहेत.
घटनेची दखल घेत महागाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक (पीआय) धनराज दिले यांनी तात्काळ घटनास्थळी बीट जमादार पाठवून पंचनामा केला. तसेच परिसरातील नागरिकांचे जबाब नोंदवून घटनेची सखोल चौकशी सुरू करण्यात आली आहे.
या घटनेचे गांभीर्य लक्षात घेता, दिनांक ४ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी महागाव पोलीस स्टेशनमध्ये आरोपींविरुद्ध गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती ठाणेदारांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना दिली. तक्रार गंभीर स्वरूपाची असल्याने आरोपींविरुद्ध विविध गंभीर कलमान्वये, दंगा, मारहाण, छेडछाड तसेच जखमी करण्याचे गुन्हे दाखल करण्यात येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या घटनेमुळे पोहंडूळ गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, पोलीस प्रशासनाकडून परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येत आहे.



