महागाव नगरपंचायत निवडणुकीचे वारे; बोगस मतदारांवरून राजकीय वातावरण तापले

महागाव : प्रतिनिधी संजय नागरगोजे
महागाव नगरपंचायत निवडणुकीचे वारे आता जोर धरू लागले असून, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदार यादीतील बोगस मतदारांचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. १ जुलै २०२५ पूर्वी प्रभागनिहाय सुमारे ८ हजार ५० मतदार आठ मतदान केंद्रांवर असल्याचे अधिकृतपणे दर्शविण्यात आले होते. मात्र, प्रत्यक्षात महागाव शहराशी कोणताही संबंध नसलेल्या बाहेरगावच्या मोठ्या प्रमाणातील बोगस मतदारांची नावे मतदार यादीत समाविष्ट असल्याचे उघड झाले आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, सुमारे पंधराशे बोगस मतदार असल्याने हे मतदान निवडणुकीत निर्णायक ठरत असून, त्यामुळे महागावातील मूळ रहिवासी नागरिकांच्या मतदानाच्या हक्कावर गंभीर आघात होत आहे. स्थानिक नागरिकांचा आरोप आहे की, या बोगस मतदारांच्या जोरावर भ्रष्ट व अपात्र उमेदवारांना निवडून दिले जाते, परिणामी चांगल्या व पात्र उमेदवारांची पायमल्ली होत आहे.
महागाव नगरपंचायत हद्दीत वास्तव्यास नसलेले, घर नसलेले तसेच बनावट आधारकार्डच्या आधारे मतदार यादीत नाव नोंदविण्यात आलेले मतदार वगळण्यात यावेत, अशी ठाम मागणी सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे. या संदर्भात बाहेरगावच्या मतदारांची स्वतंत्र यादी, पुरावे व कागदपत्रे संकलित करून ठेवण्यात आली असून, अशा मतदारांनी मतदान केल्यास फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येतील, असा इशाराही देण्यात आला आहे.
दरम्यान, मतदार यादी पारदर्शक न झाल्यास उच्च न्यायालयात दाद मागण्याचा इशारा माजी नगरसेवकांनी दिला असून, त्यामुळे प्रशासनावर दबाव वाढला आहे. या सर्व घडामोडींमुळे २०२६ मध्ये होणारी नगरपंचायत निवडणूक पारदर्शक मतदार यादीवरच होणार, अशी चिन्हे दिसत आहेत.
या पार्श्वभूमीवर महागाव शहरातील चौकाचौकात आता नगरपंचायत अध्यक्ष कोण होणार? यावर जोरदार चर्चा रंगू लागली असून, संपूर्ण शहराचे लक्ष येणाऱ्या निवडणुकांकडे लागलेले चित्र दिसत आहे.



