शहर

यवतमाळ जिल्हा हिवताप कार्यालय ‘पांढरा हत्ती’? हिवताप निर्मूलन केवळ कागदावरच; ग्रामीण-आदिवासी भागात रुग्णसंख्या वाढीवर नियंत्रण नाही**


प्रतिनिधी संजय नागरगोजे
यवतमाळ जिल्ह्यात शासनाच्या विविध आरोग्यविषयक योजना अस्तित्वात असतानाही जिल्हा हिवताप कार्यालयाचा कारभार केवळ कागदोपत्री सुरू असल्याचा गंभीर आरोप नागरिकांकडून होत आहे. जिल्ह्यात मलेरिया, थंडी वाजून ताप येणे, अंगदुखी अशा आजारांचे प्रमाण वाढत असताना हिवताप निर्मूलनाची मोहीम प्रत्यक्षात राबवली जात नसल्याचे वास्तव समोर येत आहे.
जिल्हा नियोजन समितीमार्फत हिवताप नियंत्रणासाठी निधी व योजना मंजूर होत असल्या तरी प्रत्यक्ष गावपातळीवर त्याची अंमलबजावणी होत नसल्याचा आरोप आहे. तालुका स्तरावरील हिवताप अधिकारी व आरोग्य कर्मचारी गावांमध्ये प्रत्यक्ष फिरताना दिसत नाहीत. विशेषतः ग्रामीण व आदिवासी, दुर्गम व बंदी भागात हिवताप रुग्णसंख्या वाढत असतानाही रक्ताचे नमुने (ब्लड सॅम्पल) घेतले जात नसल्याचे धक्कादायक चित्र आहे.
हिवताप तपासणीसाठी आवश्यक असलेल्या गोळ्या, औषधे व जलद तपासणी किट्स गावपातळीवर उपलब्ध नसल्याची तक्रार नागरिक करीत आहेत. परिणामी अनेक रुग्ण निदानाविना राहून आजार गंभीर अवस्थेत पोहोचत आहेत. आरोग्यविषयक जनजागृती, मार्गदर्शन, प्रतिबंधात्मक उपाययोजना या बाबी पूर्णपणे दुर्लक्षित केल्या जात असल्याचा आरोप आहे.
“हिवताप निर्मूलनाचा गवगवा फक्त अहवालापुरताच मर्यादित असून प्रत्यक्षात संपूर्ण जिल्ह्यात ही योजना कागदावरच चालू आहे,” अशी संतप्त प्रतिक्रिया ग्रामीण भागातील नागरिक व्यक्त करीत आहेत.
या गंभीर बाबीची दखल घेऊन जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच पालकमंत्री यांनी तातडीने यवतमाळ जिल्ह्यात विशेष हिवताप प्रतिबंध मोहीम राबवावी, गावपातळीवर रक्तनमुने तपासणी सक्तीची करावी व हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करून त्यांना ‘घरचा रस्ता’ दाखवावा, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button