Uncategorized

ग्रामपंचायतच्या भोंगळ कारभारामुळे गावात बेकामी विहीर; नागरिकांचा प्रशासनाकडे आक्रोश


महागाव प्रतिनिधी संजय नागरगोजे
महागाव तालुक्यातील साई (ई) गावात ग्रामपंचायतीच्या भोंगळ व निष्काळजी कारभारामुळे हिरालाल महाराज मंदिराजवळ बांधण्यात आलेली विहीर पूर्णतः बेकामी ठरली आहे. लाखो रुपये खर्च करून उभारण्यात आलेली ही विहीर कोणत्याही उपयोगाची नसून, त्यातील पाणी पिण्यायोग्य तर नाहीच; शिवाय घरगुती वापरासाठीही अयोग्य असल्याची संतप्त प्रतिक्रिया गावकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
या विहिरीमुळे सार्वजनिक आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून, धार्मिक अंधश्रद्धेला खतपाणी घालणाऱ्या प्रकारांमुळे यापूर्वी दोन व्यक्तींचा विहिरीत पडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. यापुढे आणखी किती नागरिक अथवा जनावरे या विहिरीत पडतील, याचा काही नेम नाही, अशी भीती ग्रामस्थांमध्ये व्यक्त होत आहे.
गावकऱ्यांनी वारंवार ग्रामपंचायतीकडे ही विहीर तात्काळ बुजविण्याची मागणी केली आहे. मात्र डिसेंबर २०२४ पासून ग्रामपंचायतीवर प्रशासक नेमण्यात आल्यापासून अधिकारी व कर्मचारी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. विहिरीतील पाण्याची गुणवत्ता दिवसेंदिवस अधिकच खालावत चालली असून, त्यामुळे संसर्गजन्य आजारांचा धोका निर्माण झाला आहे.
या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांनी थेट ग्रामपंचायत व संबंधित प्रशासनाकडे विहीर बुजविण्याची ठाम मागणी केली असून, प्रशासनाच्या उदासीन भूमिकेमुळे गावात तीव्र संतापाचे वातावरण आहे.
नागरिकांनी आरोप केला की, सार्वजनिक निधीतून लाखो रुपये खर्च करून उभारलेली ही विहीर कोणत्याही उपयोगाची नसून, लहान मुले, नागरिक व जनावरे यांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. हा सरळसरळ सार्वजनिक निधीचा अपव्यय असल्याचेही त्यांनी सांगितले.
तसेच विहिरीत मृत्यू झाल्यानंतर महादेवाला सोडण्यात आलेला नंदी तात्काळ काढून टाकून योग्य निर्णय घ्यावा, अशी ठाम मागणीही गावकऱ्यांनी प्रशासनाकडे केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button