नॅचरल शुगरचा १० वा गळीत हंगाम सुरू, पण साखर गोड नाही! ऊस उत्पादक शेतकरी रस्त्यावर, ट्रॅक्टर अपघातांनी चिंतेत

महागाव/सवना (गुंज): (२८ ऑक्टोबर, २०२५) – नॅचरल शुगर अँड अलाईड इंडस्ट्रीज लि. युनिट २ सवना, गुंज येथे आज (मंगळवारी) कारखान्याचे मुख्य प्रवर्तक बी. बी. ठोंबरे यांच्या हस्ते १० व्या गळीत हंगामाचा मोठ्या उत्साहात शुभारंभ करण्यात आला. या हंगामासाठी ८ हजार हेक्टर उसाची नोंद असून, ७ लाख टन गाळपाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. परंतु, या औपचारिकेतेला परिसरातील ऊस उत्पादक शेतकरी आणि नागरिक यांच्या तीव्र नाराजीची किनार लाभली आहे.
शेतकऱ्यांची नाराजी: सोळा महिन्यांचा ऊस आणि ‘गेटकी’ला प्राधान्य
महागाव परिसरात ऐतिहासिकरित्या तीन कारखाने चालतील एवढे ऊस उत्पादन होत असतानाही, नॅचरल शुगरच्या सध्याच्या धोरणांमुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत.
उत्पादनात घट: शेतकऱ्यांचा ऊस तोडणीसाठी तब्बल १६ ते १७ महिने लागत असल्याने उसाचे ‘आवरेज’ (सरासरी उत्पादन) मोठ्या प्रमाणात घटले आहे.
भेदभावपूर्ण धोरण: कारखान्याचे नियोजन समिती (कारखान्याच्या जवळचा) ऊस प्राधान्य देत ,नाहीत गेटकींन चा ऊस मात्र तोडणीसाठी मोठे प्रयत्न करते आणि त्याला प्राधान्य देते. यामुळे परिसरातील शेतकरी प्रचंड संतापले आहेत.
दुसऱ्या कारखान्याकडे धाव: मागील वर्षी तोडणीत दोन महिने उशीर झाल्यामुळे शेतकऱ्यांनी आपला ऊस अन्य कारखान्यांना दिला होता. यंदाही परिस्थिती तीच असल्याने, याच भागातील शेतकरी आपला ऊस दुसऱ्या कारखान्यांना देण्याच्या तयारीत आहेत.
दुर्लक्षित अपघात आणि चाळणी झालेले रस्ते!
गळीत हंगाम सुरू होताच वाढलेल्या अपघातांवर कारखाना प्रशासनाने दाखवलेल्या उदासीनतेबद्दल परिसरातील नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
“रात्रीच्या वेळी ट्रॅक्टरमुळे झालेल्या अनेक अपघातात मोटरसायकलस्वारांचे प्राण गेले आहेत. तरीही, नियोजन समितीने ट्रॅक्टरला रात्री दिसणारे लाईट किंवा रेडियम लावण्यासारखे साधे उपाय केले नाहीत,” असे परिसरातील नागरिकांचे म्हणणे आहे.
जड वाहनांच्या सततच्या वर्दळीमुळे गुंज, वाकोडी, वेणी, सवना, महागाव या रस्त्यांची अक्षरशः चाळणी झाली आहे, ज्यामुळे अपघातांना निमंत्रण मिळत आहे. कारखान्याच्या व्यवस्थापकीय संचालकांनी (एमडी) या वाहतूक आणि अपघात नियंत्रणाकडे लक्ष न दिल्याने, हा हंगाम अपघातांचा ठरू नये यासाठी नागरिकांनी कठोर पाऊले उचलण्याची मागणी केली आहे.
मागणी: कारखाना चालकांनी तातडीने ऊस तोडणीचे वेळापत्रक सुधारून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा आणि अपघात टाळण्यासाठी ट्रॅक्टर वाहतुकीचे ठोस नियोजन करावे, अन्यथा हे शेतकरी आंदोलन करतील, असा इशारा परिसरातील नागरिकांनी दिला आहे.



