शहर

परिविक्षाधीन तहसीलदार रोहित शिंदेंची महागावमध्ये धडक कारवाई!रेती तस्करांना पळता भुई थोडी; तीन ट्रॅक्टर जप्त

महागाव, (प्रतिनिधी):
दीपावलीच्या सुट्ट्यांमध्ये अधिकारी कर्मचाऱ्यांच्या अनुपस्थितीचा फायदा घेऊन अवैध गौण खनिज तस्करांनी महागाव परिसरात सुरू केलेल्या रेती चोरीवर परिविक्षाधीन तहसीलदार रोहित शिंदे यांनी मंगळवारी सकाळी दबंग कारवाई केली आहे. उपविभागीय अधिकारी सखाराम मुळे यांच्या मार्गदर्शनात ही कारवाई करण्यात आली, ज्यामुळे रेती माफियांच्या गैरसमजाला चांगलाच धक्का बसला आहे.
सकाळ-सकाळ धडाकेबाज कारवाई
महागाव तहसील कार्यक्षेत्रात तहसीलदार अभय मस्के यांच्या कार्यकाळात रेती तस्करांना खुली सूट मिळाल्याने त्यांनी ‘आमचे कुणीच काही करू शकत नाही’ या अविर्भावात रेती चोरीचा सपाटा लावला होता. मात्र, मंगळवार, २८ ऑक्टोबर रोजी सकाळी सात वाजताच्या सुमारास, परिविक्षाधीन तहसीलदार रोहित शिंदे यांनी गोपनीय माहितीच्या आधारे अचानकपणे तीन वेगवेगळ्या ठिकाणी धाडी टाकल्या.
यावेळी रेतीने भरलेले तीन ट्रॅक्टर रंगेहात पकडण्यात आले.
माळेगाव सिपनदी पात्रातून: योगेश कैलास राठोड यांच्या ताब्यातील ट्रॅक्टर क्र. MH 29 /CJ/2024.
माळकिन्ही परिसरातून: शाहरुख शेख रमजान यांच्या ताब्यातील ट्रॅक्टर क्र. MH/36/Z/2228.
सवना-महागाव मार्गावरून: शिवाजी गरुड यांच्या ताब्यातील (सोनालिका कंपनीचा) ट्रॅक्टर.
प्रशासकीय प्रांगणात ट्रॅक्टर उभे
जप्त केलेले तिन्ही ट्रॅक्टर प्रशासनाने थेट महागाव तहसीलच्या प्रशासकीय इमारतीच्या प्रांगणात उभे केले आहेत. या कारवाईमुळे रेती तस्करांना पळता भुई थोडी झाली असून परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
दक्ष अधिकारी म्हणून वचक:
रोहित शिंदे यांची ‘नव्या दमाचे’ आणि ‘जाबाज अधिकारी’ म्हणून ओळख निर्माण झाली आहे. यापूर्वीही त्यांनी अशा अनेक कारवाया करत दंड आकारणीसाठी प्रकरणे उपविभागीय अधिकारी उमरखेड यांच्याकडे पाठविली आहेत. या धाडसी कार्यवाहीमुळे शासनाच्या तिजोरीत महसूल वाढण्यास मदत होणार आहे.
शिंदे यांनी केलेल्या या धडाकेबाज कारवाईमुळे महागावच्या महसूल प्रशासनात चांगलाच धाक निर्माण झाला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button