भवानी गाव हादरले! एकाच कुटुंबातील शेतकरी दाम्पत्याची पाठोपाठ आत्महत्या

महागाव प्रतिनिधी संजय नागरगोजे
उमरखेड तालुक्यातील भवानी गावात एकाच कुटुंबातील शेतकरी दाम्पत्याने पाठोपाठ आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली असून, संपूर्ण गाव शोकसागरात बुडाले आहे.
शनिवार, 20 डिसेंबर 2025 रोजी शेतकरी अशोक दत्ता कुंटलवार यांनी सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. बराच वेळ घरी न परतल्याने शोध घेतला असता गावाजवळील विहिरीत त्यांचा मृतदेह आढळून आला. या घटनेने कुटुंबीय व गावकरी हादरून गेले.
पतीच्या मृत्यूच्या धक्क्यातून सावरत असतानाच रविवारी त्यांची पत्नी सविता अशोक कुंटलवार यांनीही विहिरीत उडी घेऊन जीवन संपवले. कुटुंबावर असलेले कर्जाचे ओझे व मानसिक ताण यामुळे हा टोकाचा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे.
या दुर्दैवी घटनेमुळे शेतकरी आत्महत्यांचे सत्र कधी थांबणार? असा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, शासन व लोकप्रतिनिधींना मतदारसंघातील वास्तवाची जाणीव आहे का? असा संताप व्यक्त होत आहे.
घटना खरबी–दराटी पोलीस स्टेशन हद्दीत घडली असून, पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.



