शहर

जंतर-मंतर लाठी हल्ल्या विरोधात उमरखेड युवक काँग्रेसची स्वाक्षरी मोहीम

(स्वाक्षरी अभियानातून केंद्र सरकारला घेरले ; विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी युवक काँग्रेस आक्रमक)

उमरखेड :
दिल्लीतील जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाला जाहीर पाठिंबा देत, लाठी हल्ल्याविरोधात घोषणाबाजी, उमरखेड शहर युवक काँग्रेसच्या वतीने, शुक्रवारी महात्मा गांधी पुतळ्यासमोर, स्वाक्षरी अभियान राबवून करण्यात आली.

या स्वाक्षरी आंदोलनात, युवक काँग्रेसच्या वतीने तीन प्रमुख मागण्या मांडण्यात आल्या. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विद्यार्थ्यांची जाहीर माफी मागावी तसेच आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांशी कथित अमानुष वागणूक देणाऱ्या संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी पदाधिकाऱ्यांनी केली. अभियानात युवक काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते, विद्यार्थी तसेच नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांना समर्थन दर्शविले.

अभियानादरम्यान विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ नागरिकांकडून मोठ्या प्रमाणावर स्वाक्षऱ्या घेण्यात आल्या. विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठीचार्ज व कारवाईचा तीव्र निषेध व्यक्त करत केंद्र सरकारने विद्यार्थ्यांच्या मागण्यांची तातडीने दखल घ्यावी, अशी जोरदार मागणी करण्यात आली. युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, लोकशाही मार्गाने सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा आवाज दडपण्याचा प्रयत्न न करता त्यांच्या मागण्यांवर सकारात्मक तोडगा काढणे ही सरकारची जबाबदारी आहे. देशातील विद्यार्थ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी युवक काँग्रेस नेहमीच त्यांच्या पाठीशी ठामपणे उभी राहील, असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला. या स्वाक्षरी मोहिमेत हजारो विद्यार्थी, नागरिकांनी व कार्यकर्त्यांनी आपली स्वाक्षरी करून, केंद्र शासनाच्या दडपशाही धोरणाचा, विरोध नोंदविला होता.
या स्वाक्षरी अभियानात काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस गोपाल अग्रवाल, युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष ईश्वर गोस्वामी, उपाध्यक्ष दर्शन भंडारी, अक्षय अभय गोस्वामी, देवा इंगोले, सिद्धेश्वर जगताप, प्रकाश वानखेडे, कैलास इंगोले, सूरज जाधव, शंकर टमके यांच्यासह युवक काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते, विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button