हरवलेला मोबाईल तेलंगणातून शोधून महागाव पोलिसांनी केला परत

बोलेरो पिकअप चोरी व सोनार दुकान दरोडा अजून उघडकीस नाही; नागरिकांकडून विशेष तपास पथकाची मागणी
महागाव प्रतिनिधी संजय नागरगोजे
महागाव पोलिसांनी अत्याधुनिक तांत्रिक तपासातून तेलंगणा राज्यातील रंगारेड्डी जिल्ह्यातून हरवलेला मोबाईल शोधून काढत तो मूळ मालकांकडे सुरक्षित परत केला आहे.
हा मोबाईल रुपेश उत्तमराव करे (रा. कासाळबेल) यांचा असून तो रस्त्यावर हरवला होता. मोबाईलमध्ये वैयक्तिक व महत्त्वाची माहिती असल्यामुळे करेकरींनी महागाव पोलिसात तक्रार दाखल केली होती.
तक्रार मिळताच पोलिसांनी तांत्रिक तपास, सीसीटीव्ही फुटेज विश्लेषण आणि राज्याबाहेरील लोकेशनचा मागोवा घेत मोबाईल मिळविण्यात यश मिळवले. जिल्हा पोलिस दलाच्या तांत्रिक कौशल्याचे हे काम कौतुकास्पद ठरत आहे.
दरम्यान, महागाव तालुक्यातील तीन बोलेरो पिकअप चोरी प्रकरणांमध्ये अद्याप कोणताही ठोस तपास उघडकीस आलेला नाही. वाहन चालक व मालकांनी पोलिस स्टेशनला भेट देत तपासाबाबत माहिती विचारली.
याशिवाय, हिवरा येथील सोनाराच्या दुकानात झालेली मोठी चोरी अद्याप उघडकीस आलेली नाही. या प्रकरणांवर अद्याप कार्यवाही न झाल्याने नागरिकांनी महागाव पोलिसांनी विशेष तपास पथक (Special Investigation Team) तयार करून बोलेरो चोरी व सोनार दुकानातील दरोड्याचा तपास तातडीने करावा, अशी मागणी केली आहे.



