महागावमध्ये गौण खनिजांचे अवैध उत्खनन उफाळले; महसूल विभाग हातावर हात — 32 लाख दंडापैकी फक्त 18 लाख वसुली!

महागाव (प्रतिनिधी)
महागाव तालुक्यात गौण खनिजांच्या अवैध उत्खनन आणि वाहतुकीचा पेव फुटला असून, महसूल विभागाचे मोठ्या प्रमाणातील निष्क्रियता आणि ढिलाईमुळे शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत असल्याचा आरोप नागरिकांतून होत आहे. ऑक्टोबर महिन्यात महसूल प्रशासनाने 28 प्रकरणे नोंदवून 32 लाख 78 हजार 496 रुपयांचा दंड ठोठावला; मात्र प्रत्यक्ष वसुली फक्त 18 लाख 38 हजार 314 रुपये इतकी झाली असून 14 लाख 40 हजार 182 रुपये थकित पडून आहेत.
या 28 प्रकरणांपैकी एकाही प्रकरणात फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले नाहीत, ही महागाव महसूल विभागाची सर्वात मोठी शोकांतिका असल्याचे नागरिकांचे मत आहे. महसूल मंत्री बावनकुळे यांनी दंड आणि गुन्हा — दोन्ही कारवाया कराव्यात अशा स्पष्ट सूचनांचे पत्र महसूल विभागाला प्राप्त झाले असतानाही फौजदारी गुन्हे दाखल न होणे संशयास्पद ठरत आहे.
नायब तहसीलदार रोहन शिंदे यांच्या नियुक्तीनंतरच मोठी कारवाई!
तहसीलदार अभय मस्के यांच्या काळात रेती माफियाविरोधात विशेष कारवाई करण्यात आली नाही. मात्र नायब तहसीलदार म्हणून रोहन शिंदे यांनी रुजू झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात अवैध उत्खननाविरोधात धडाडीची कारवाई करण्यात आली.
शासनाची वाहनसुविधा नसतानाही त्यांनी १५–२० तस्करांवर थेट कारवाई करून दंडात्मक प्रक्रिया राबवली.
यामुळे तालुक्यातील रेती उत्खनन कारवायांचे खरे स्वरूप उघडकीस आले असून महसूल विभागातील पूर्वीच्या निष्क्रियतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.



