सवना–गुंज रस्त्यावर अपघातांचा पिसाट वाढ — उसाची ट्रॉली तुटली, वाहतूक ठप्प; नागरिकांचा नॅशनल शुगरवर संताप

महागाव प्रतिनिधी संजय नागरगोजे
सवना बसस्थानकाजवळील रस्त्यावर पडलेल्या खोल खड्ड्यांमुळे उसाची वाहतूक करणाऱ्या वाहनांना मोठा धोका निर्माण झाला आहे. मंगळवारी सकाळी उसाने भरलेली ट्रॉली अचानक तुटून रस्त्यावर पलटली, त्यामुळे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. सुदैवाने जीवितहानी टळली; मात्र स्थानिकांनी प्रशासन आणि नॅशनल शुगर फॅक्टरीच्या निष्काळजीपणावर तिव्र नाराजी व्यक्त केली आहे.
सवना–गुंज रस्त्यावर तसेच बसस्टॉप परिसरात मोठमोठे खड्डे पडले असून, दररोज हजारो ट्रक–ट्रॅक्टर येथे उस घेऊन ये-जा करतात. त्यामुळे वारंवार ट्रॉली पलटण्याचे प्रकार घडत आहेत. गेल्या दोन दिवसांत ट्रॉली उलटण्याच्या दोन घटना घडल्या आहेत.
यात भर म्हणून उसाच्या ट्रकला विद्युत तार अडकून चालू तारेचे नुकसान झाले. करंटची तार तुटल्याने मोठा अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली होती. हे सर्व प्रकार हाकेच्या अंतरावर असूनही रस्तादुरुस्ती न झाल्याने लोकांत तीव्र रोष आहे.
स्थानिकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे (पीडब्ल्यूडी) अनेकदा रस्ता दुरुस्तीची मागणी केली. नॅशनल शुगरचे जनरल मॅनेजर कदम यांनीही संबंधित विभागाला लेखी निवेदन दिल्याचे सांगितले. मात्र अद्याप कोणतीही दुरुस्ती न झाल्याने नागरिक संतप्त आहेत.
“जीव गेल्यानंतर काम करून काय उपयोग? एखादा दिवस मोठी हानी झाली तर जबाबदार कोण?” असा प्रश्न सवना गावातील नागरिकांनी उपस्थित केला आहे.
गावकऱ्यांनी तातडीने सवना–गुंज रस्ता दुरुस्त करून खड्डे बुजवावेत, बसस्टॉप परिसरातील धोका दूर करावा, अशी मागणी केली आहे.



