मुख्यमंत्री साहेब, पुरग्रस्त शेतकऱ्यांची व्यथा पहा! तातडीने मदत जाहीर करा!

- उमरखेड तालुक्यात पावसाचा कहर; शेती, जनजीवन धोक्यात , पळशी तिवरंग गावांना पुराचा वेडा
- पूरग्रस्तांना आधार द्या, संकटातून बाहेर काढा!
- एनडीआरएफ पथक सज्य
शेख मुजाहिद ससंपादक मो.7798306192
उमरखेड :-अविरत पावसामुळे उमरखेड तालुक्यातील मराठवाड्याच्या सिमेवरील पळशी, हातला गावांना पुराचा वेडा पडला असून झाडगाव, तिवरंग, नागापूर, बारा,पिंपळदरी, मोहदरी, धनज आणि मोठं गाव असलेलं मुळावा येथे गंभीर पूरस्थिती निर्माण झाली आहे. पैनगंगा आणि इतर नद्यांना पूर आल्याने अनेक गावांचा संपर्क तुटलेला आहे.
इसापूर धरणाचे 13 दरवाजे दीड ते दोन मीटरने उघडले गेले असून वरच्या बाजूला असलेल्या जयपूर बंधाऱ्यातूनही मोठ्या प्रमाणावर पाणी सोडण्यात येत आहे. पाण्याचा विसर्ग सुरूच असून आणखी दरवाजे उघडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. परिणामी, पूरस्थिती अधिकच गंभीर होण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
शेती पाण्याखाली, शेतकऱ्यांचे आयुष्य उद्ध्वस्त
तिवरंग, झाडगाव आणि आसपासच्या गावांतील संपूर्ण शेती क्षेत्र जलमय झालं आहे. मुळावा ओढ्याच्या काठावर असलेल्या शेतकऱ्यांचे सोयाबीन, ऊस, टमाटे आणि फळबागांचे पीक वाहून गेले आहे. हातला गावातील केळी आणि ऊसाचे पीकही उध्वस्त झाले असून हजारो शेतकऱ्यांचे संसार उघड्यावर आले आहेत.
पिंपळदरी गावात ओढ्याला पूर आल्याने गावातच पाणी शिरलं आहे. नाला खोलीकरणाची मागणी ग्रामस्थांनी पुन्हा एकदा आक्रमकपणे मांडली आहे.
संपर्क तुटला, पुरवठा खोळंबला
शे. पिंपरी पुलावर पाणी आल्याने मागील 60 तासांपासून विदर्भ व मराठवाड्याचा संपर्क पूर्णतः तुटलेला आहे. पंचकृषीतील अनेक ओढ्यांतून विसर्ग होऊ शकलेला नाही. त्यामुळे अनेक गावांत अन्न, पाणी, औषध यांचा तीव्र तुटवडा निर्माण झाला आहे.
गर्भवती महिलेसाठी जीव धोक्यात घालून स्थलांतर
तिवरंग येथील एक गरोदर महिला पूरग्रस्त घरात अडकली होती. पैनगंगेच्या पुराचे पाणी घराजवळ पोहोचल्याने तिच्या जीवाला धोका निर्माण झाला होता. वेळीच सूचना मिळताच गावाचे सरपंच, तलाठी ,कोतवाल आणि आशा सेविकेच्या मदतीने तिला तत्काळ सुरक्षितपणे जी. प. शाळेत स्थलांतरित करण्यात आले. स्थानिक प्रशासनाच्या तत्परतेने एक अनर्थ टळला.
प्रशासनाच्या पाहण्या, पण निर्णय कोठे?
उमरखेड महसूल विभाग, तहसीलदार, कृषी अधिकारी आणि उपविभागीय अधिकारी यांनी पूरग्रस्त भागांचा दौरा करून नुकसानीचा आढावा घेतला. काही स्थानिक राजकीय नेते शेतकऱ्यांची भेट घेत असले तरी अद्याप ठोस मदतीची घोषणा झालेली नाही.
मुख्यमंत्र्यांचा दौरा पुढे ढकलला, शेतकऱ्यांत नाराजी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आजचा पुसद दौरा नियोजित होता. परंतु प्रतिकूल हवामानामुळे दौरा पुढे ढकलण्यात आला. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर आहे. अनेकांनी “दौरे नव्हे, तात्काळ मदत हवी” अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.
आता तरी सरकार जागं होईल का?
शेतकऱ्यांचे नुकसान प्रचंड आहे. जनजीवन विस्कळीत आहे. पूरग्रस्त भागांना तातडीने आर्थिक मदत, पीकविमा भरपाई, कर्जमाफी आणि पुनर्वसनाच्या दीर्घकालीन उपाययोजना आवश्यक आहेत.
राजकीय पाहण्या आणि घोषणांपेक्षा आता कृती गरजेची आहे!
सरकारने त्वरित लक्ष देऊन शेतकऱ्यांना आधार द्यावा, हीच गावकऱ्यांची एकमुखी मागणी आहे.



