कर्जमाफीच्या मागणीसाठी आंदोलनात राज्य कृषिमंत्र्याचा पुतळा जाळला

विविध राजकीय पक्षांच्या पाच पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल !
शेख मुजाहिद ससंपादक मो.7798306192
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मागणीसाठी ढाणकी येथे प्रहारचे आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय चक्काजाम आंदोलन झाले. या आंदोलनानंतर फुलसांगी फाटा येथे राज्य कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचा पुतळा जाळल्याची घटना घडली असून याप्रकरणी मनसे, प्रहार, उभाटा व आझाद समाज पार्टीच्या पदाधिकाऱ्यांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
चक्काजाम आंदोलन 24 जुलै रोजी सकाळी 11 वाजता करण्यात आले. पोलिसांनी यावेळी शिवाजी चौक परिसरात मोठा बंदोबस्त लावला होता. मात्र, मनसेचे तालुकाध्यक्ष सादिक शेख , आझाद समाज पार्टीचे जिल्हाध्यक्ष प्रशांत उर्फ जॉन्टी विणकरे, प्रहार तालुका अध्यक्ष, सय्यद माजीद , उबाठा माजी शहराध्यक्ष बंटी जाधव, मुकुंद जोशी यांनी पोलिसांना चकमा देत चक्काजाम ठिकाणापासून 500 मीटर अंतरावर, फुलसांगी फाटा येथे पुतळा दहन केल्याचे निदर्शनास आले.
पाच जणांविरोधात गुन्हे दाखल
या घटनेनंतर पोलीस कर्मचाऱ्यांच्या फिर्यादीवरून खालील पाच जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे:
- सादिक रशीद शेख (वय 39) – मनसे तालुकाध्यक्ष
- प्रशांत उर्फ जॉन्टी विनकरे (वय 30) – आझाद समाज पार्टी
- सय्यद माजिद सय्यद पाशा (28) प्रहार जनशक्ती पक्ष,
- बंटी मधुकर जाधव (वय 45) – उभाटा शहरप्रमुख
- मुकुंद मधुकर जोशी (वय 38) – कार्यकर्ता
या सर्वांवर सार्वजनिक मालमत्ता नुकसान प्रतिबंधक कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेत कोणतीही आर्थिक वा जीवित हानी झालेली नाही,
आंदोलकांचा दावा: निषेध म्हणून प्रतीकात्मक पुतळा दहन
सदर प्रकरणावर प्रतिक्रिया देताना आजाद समाज पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रशांत उर्फ जॉन्टी विणकरे यांनी म्हटले आहे की
“शेतकऱ्यांच्या कर्जमाफी साठी संपूर्ण राज्यभर झालेल्या चक्काजाम आंदोलनात आंदोलकांवर कुठेही गुन्हा दाखल झाला नसून बिटरगाव पोलिसांनी केवळ राजकीय दबावापोटी गुन्हा दाखल केल्याने आम्ही याचा निषेध करतो शेतकऱ्यांसाठी सुरू असलेला लढा आम्ही यानंतर अजूनही तीव्र करणार आहोत.
चौकट: घटनेचे ठळक मुद्दे
स्थळ: फुलसांगी फाटा, ढाणकी
घटना: राज्य कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या पुतळ्याचे दहन
वेळ: सकाळी 11 वाजता
आयोजक: प्रहारचे बच्चू कडू यांचे आवाहन
आरोपी: पाच राजकीय पदाधिकारी
हानी: कोणतीही शारीरिक वा आर्थिक हानी नाही
पोलिस कारवाई: गुन्हे दाखल पुढील चौकशी सुरू.



