उमरखेड- यवतमाळच्या प्रवाश्यांच्या खिशाला कात्री नव्या सर्वेनुसार तिकीट दर निश्चित करावे

प्रवासाचे अंतर ११० किमीचे अन् एसटीचे भाडे ११३ किमीचे
शेख मुजाहिद ससंपादक मो.7798306192
उमरखेड : ‘लालपरी’ अर्थातच महामंडळाची एसटी बस गोरगरीब प्रवाशांसाठी हक्काची आहे. मात्र सध्या उमरखेड ते यवतमाळ या मार्गावर धावणाऱ्या एस.टी. महामंडळाच्या बसेसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या खिशाला कात्री लावली जात आहे. ११३ किलोमीटरचे भाडे तिकीटाद्वारे वसूल केले जात असून, प्रत्यक्षात हे अंतर केवळ ११० किलोमीटर असल्याने प्रवाश्यात संताप आहे.उमरखेड ते यवतमाळ येणाऱ्या प्रवाश्यांची संख्या मोठी आहे. जिल्हा मुख्यालयात अनेक कामांसाठी नागरिकांना यावे लागते. सर्वांकडेच चारचाकी वाहने नाहीत. त्यामुळे एसटी बसने प्रवास करण्याशिवाय अनेकांना पर्याय नाही. उमरखेड ते यवतमाळ हे अंतर ११० किमीचे आहे. प्रत्यक्षात एसटी बसमध्ये वाहकांकडून ११३ किमीचे भाडे घेतले जात असल्याची प्रवाश्यांची तक्रार आहे. प्रवाशांकडून जादा भाडे वसूल होत असल्याने आता प्रवाशी हैराण आहेत. नव्या सर्वेनुसार अंतर मोजून तिकीट दर पुन्हा निश्चित करण्याची मागणी प्रवाशांकडून जोर धरत आहे. सध्या महामंडळाने जुन्या मोजमापाच्या आधारे भाडे निश्चित केले असून त्याचा फटका सामान्य प्रवाशांना बसत असल्याचे बोलले जात आहे. या मार्गावरील चालणाऱ्या एस टी बसच्या माध्यमातून शेकडो नागरिक, नौकरदार वर्गासह विद्यार्थी प्रवास करतात. त्यामुळे किरकोळ अंतर असूनही जादा भाड्यामुळे प्रवाशांना दररोज अतिरिक्त आर्थिक भार सहन करावा लागत आहे. स्थानिक प्रवाशांनी याला लुटमारीची संज्ञा देत, एस.टी. महामंडळाने नव्याने मार्गाचे सर्वेक्षण करून अंतर निश्चित करावे आणि प्रवाशांची लुट थांबवावी, अशी मागणी स्थानिक प्रवासी नागरीकांमधून उमटत आहे.



