पंचायत समिती महागाव प्रशासकीय इमारतीच्या भूमिपूजनावरून वाद शासकीय पत्रिका निघाली नाही; तीन कोटी ४२ लाखांच्या कामाबाबत चर्चा

महागाव प्रतिनिधी | संजय नागरगोजे
जिल्हा परिषद सहाय्यक अनुदान (शीर्षक क्र. 25 15 00 53) अंतर्गत सन २०२४–२५ योजनेत पंचायत समिती महागावच्या नवीन प्रशासकीय इमारतीसाठी सुमारे ३ कोटी ४२ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असून, २० फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी साडेनऊ वाजता भूमिपूजन सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
मात्र या शासकीय कार्यक्रमाबाबत अधिकृत पत्रिका जिल्हा परिषद यवतमाळ किंवा बांधकाम विभागाकडून प्रसिद्ध न झाल्याने विविध राजकीय व प्रशासकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे.
भाजपकडून पत्रिका प्रसिद्ध?
सदर भूमिपूजन कार्यक्रमासाठी पत्रिका राजकीय पक्षाकडून प्रसिद्ध करण्यात आल्याची चर्चा आहे. कार्यक्रमास राज्याचे राज्यमंत्री इंद्रनील नाईक (उद्योग, सार्वजनिक बांधकाम, उच्च व तंत्रशिक्षण, आदिवासी विकास, पर्यटन, मृद व जलसंधारण) यांच्या शुभहस्ते सोहळा होणार असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
उद्घाटक म्हणून आमदार किसनराव वानखेडे उपस्थित राहणार असून, माजी आमदार प्रकाश पाटील, विजयराव खडसे, ससाणे, उत्तमराव इंगळे आदी मान्यवरांची उपस्थिती दर्शविण्यात आली आहे.
अधिकृत पत्रिका का नाही?
शासकीय निधीतून उभारण्यात येणाऱ्या महत्त्वाच्या इमारतीच्या भूमिपूजन कार्यक्रमासाठी अधिकृत पत्रिका का प्रसिद्ध करण्यात आली नाही, हा प्रश्न उपस्थित केला जात आहे. शासकीय कार्यक्रमात अधिकृतता आणि पारदर्शकता अपेक्षित असताना प्रशासनाकडून भूमिका स्पष्ट करण्यात आलेली नाही.
ठेका प्रक्रियेवरही प्रश्नचिन्ह
सदर ३ कोटी ४२ लाख रुपयांच्या इमारतीचे बांधकाम कोणत्या निकषांवर आणि कोणत्या अनुभवाधारक ठेकेदाराला देण्यात आले, याबाबतही काही ठिकाणी चर्चा सुरू आहे. काम इस्टिमेटनुसार व गुणवत्तापूर्ण पद्धतीने व्हावे, यासाठी बांधकाम विभागाने काटेकोर देखरेख करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
प्रशासनाची भूमिका अपेक्षित
या संदर्भात संबंधित शासकीय अधिकाऱ्यांची अधिकृत भूमिका अद्याप समोर आलेली नाही. कार्यक्रमाच्या निमित्ताने निर्माण झालेल्या चर्चेला पूर्णविराम देण्यासाठी प्रशासनाने स्पष्टीकरण देणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त होत आहे.
सार्वजनिक निधीतून उभारण्यात येणाऱ्या या भव्य प्रशासकीय इमारतीचे बांधकाम पारदर्शक, दर्जेदार आणि वेळेत पूर्ण व्हावे, हीच सर्वसामान्यांची अपेक्षा आहे.



