महागाव तालुक्यात गुटखा तस्करीचा विळखा; होलसेल व्यापाऱ्यांवर कारवाईची मागणी

शालेय विद्यार्थ्यांमध्ये वाढते व्यसन चिंतेचा विषय; नागरिकांचा प्रशासनाला इशारा
महागाव प्रतिनिधी : संजय नागरगोजे
महागाव शहरासह तालुक्यात प्रतिबंधित गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थांची विक्री मोठ्या प्रमाणात सुरू असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे. आर्णी व माहूर परिसरातून मोठ्या प्रमाणात गुटख्याची आवक होत असून महागाव, फुलसावंगी, हिवरा, गुंज, मुडाणा आणि इतर ग्रामीण भागातील किराणा दुकानांपर्यंत त्याचे जाळे पोहोचल्याची चर्चा परिसरात आहे.
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, काही होलसेल व्यापाऱ्यांकडून वाहनांच्या माध्यमातून गावोगावी गुटखा पुरवठा केला जात असून अनेक किराणा दुकानांवर सर्रास विक्री सुरू आहे. प्रतिबंधित असतानाही सुरू असलेल्या या व्यवसायामुळे शालेय वयातील मुलांमध्ये व्यसनाधीनतेचे प्रमाण वाढत असल्याची चिंता पालक आणि सामाजिक कार्यकर्त्यांकडून व्यक्त केली जात आहे.
विशेषतः १५ ते १८ वयोगटातील विद्यार्थी गुटख्याच्या आहारी जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर तसेच शैक्षणिक भवितव्यावर विपरीत परिणाम होत असल्याचे मत व्यक्त करण्यात येत आहे.
दरम्यान, किरकोळ विक्रेत्यांवर अधूनमधून कारवाई होत असली तरी मोठ्या प्रमाणात पुरवठा करणाऱ्या कथित होलसेल व्यापाऱ्यांवर आजपर्यंत प्रभावी कारवाई झालेली दिसून येत नसल्याची नाराजी नागरिकांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे या अवैध साखळीमागील मुख्य सूत्रधारांवर गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी जोर धरत आहे.
अन्न व औषध प्रशासन विभागाने गुटखा विक्री रोखण्यासाठी अधिक व्यापक आणि सातत्यपूर्ण मोहीम राबवावी, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. तसेच गुटखा पुरवठ्याच्या संपूर्ण साखळीची चौकशी करून जबाबदार व्यक्तींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे.
सामाजिक कार्यकर्त्यांनी या प्रकरणाची दखल घेऊन वरिष्ठ पातळीवर तक्रारी केल्याची चर्चा असून, संबंधित यंत्रणांनी याबाबत तातडीने लक्ष घालावे, अन्यथा जनआंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही काही नागरिकांनी दिला आहे.



