शहर

भोसातील अवैध रेती साठा प्रकरणी चौकशीची मागणी; आमरण उपोषणाचा इशारा


महागाव प्रतिनिधी संजय नागरगोजे
महागाव तालुक्यातील भोसा येथील ई-क्लास व गायरान जमिनीवरील कथित अवैध रेती साठा प्रकरणात महसूल विभागाच्या अहवालावर आक्षेप घेत स्थानिक रहिवासी प्रदीप पांडुरंग जगताप यांनी तहसीलदारांकडे सविस्तर तक्रार दाखल केली आहे. संबंधित मंडळ अधिकारी व तलाठी यांनी रेती तस्करांना संगनमताने पाठबळ दिल्याचा आरोप करत त्यांनी या प्रकरणाची फेरचौकशी करून दोषींवर फौजदारी कारवाई करण्याची मागणी केली आहे.
तक्रारीनुसार, महसूल विभागाने सादर केलेला अहवाल वस्तुस्थितीला धरून नसून चुकीची माहिती देण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. भोसातील शेत सर्व्हे क्रमांक 62, 62/1 व 63 संदर्भातील नकाशे आणि कागदपत्रांचा दाखला देत रेतीचा साठा हा सरकारी वन व गायरान जमिनीवर असल्याचे अर्जदाराने नमूद केले आहे.
या प्रकरणात शासनाची व स्वतःची दिशाभूल झाल्याचा आरोप करत संबंधित अधिकाऱ्यांची स्वतंत्र चौकशी करण्याची मागणीही करण्यात आली आहे. तसेच निष्पक्ष चौकशी करून दोषींवर तात्काळ कारवाई न झाल्यास 17 जून 2026 पासून आमरण उपोषणास बसण्याचा इशारा अर्जदाराने दिला आहे.
सदर निवेदनाची प्रत जिल्हाधिकारी, यवतमाळ तसेच उपविभागीय अधिकारी, उमरखेड यांनाही पाठविण्यात आली आहे. या तक्रारीमुळे भोसातील कथित अवैध रेती साठा प्रकरण पुन्हा चर्चेत आले असून प्रशासन याबाबत काय भूमिका घेते याकडे परिसराचे लक्ष लागले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button