शहर

महागाव नगरपंचायत : सत्तांतरानंतर स्वच्छतेचा प्रश्न ऐरणीवर


महागाव प्रतिनिधी संजय नागरगोजे
कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती दीपक आडे यांच्या २०१७ ते २०२३ या कार्यकाळातील कामांचे ऑडिट सुरू असतानाच, महागाव नगरपंचायतीत सत्तांतरानंतर नवीन नगराध्यक्ष रंजना दीपक आडे यांनी २७ फेब्रुवारी २०२६ रोजी पदभार स्वीकारला. भारतीय जनता पार्टीने काँग्रेस, शिवसेना व उभाटा शिवसेनेच्या पाठिंब्याने अध्यक्षपद मिळवले असले, तरी आता नागरिकांचे लक्ष कामगिरीकडे लागले आहे.
कचर्‍याचे साम्राज्य; स्वच्छतेकडे दुर्लक्ष?
महागाव शहरात सध्या ठिकठिकाणी कचर्‍याचे ढिगारे पडलेले दिसत आहेत. पूर्वी काँग्रेसच्या कार्यकाळात भारतीय जनता पार्टीने केवळ एक दिवसासाठी स्वच्छता मोहीम राबवून फोटोसेशन केले होते, अशी टीका होत आहे. आता नऊ महिन्यांसाठी एकहाती सत्ता मिळाल्यानंतर प्रत्यक्षात शहर स्वच्छ करण्याचे आव्हान भाजपसमोर आहे.
डम्पिंग ग्राउंडला जाण्यासाठी रस्ता नसल्याने कचरा नेमका कुठे टाकायचा, हा गंभीर प्रश्न आहे. नगरपंचायत आवारात शासनाकडून उपलब्ध करून दिलेली ट्रॅक्टर, कचरा उचलणाऱ्या गाड्या, अँब्युलन्स, फायर ब्रिगेड यांसह इतर वाहने धूळ खात उभी असल्याचे चित्र आहे. या यंत्रणांचा योग्य वापर होणार का, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित होत आहे.
नाल्यांचे पाणी रस्त्यावर
डॉ. राठोड यांच्या घरासमोरून नाल्याचे पाणी थेट रस्त्यावर वाहत असून त्याच पाण्यावरून नगरपंचायत कार्यालयात जावे लागत असल्याची गंभीर स्थिती आहे. प्रभाग क्रमांक १४, १३, १२ मध्येही नाल्या साफ न झाल्याची तक्रार आहे.
कर्मचारी अपुरे असल्याचे कारण पुढे केले जात असले, तरी ठेकेदारांकडून जिओ-ट्रेकिंग फोटोद्वारे बिले काढली जात असल्याचा आरोप आहे. काम न करता बिले काढणाऱ्या ठेकेदाराला ब्लॅकलिस्ट करण्याची हिंमत प्रशासन दाखवणार का, हा प्रश्नही उपस्थित होत आहे.
ऑडिटची छाया आणि भविष्यातील जबाबदारी
कृषी उत्पन्न बाजार समितीत आवश्यक नसताना रस्ता करून सुमारे एक कोटी रुपयांचा नियमबाह्य खर्च केल्याचा आरोप असून त्या कामाचे ऑडिट सुरू आहे. अशीच परिस्थिती नगरपंचायतीत होऊ नये, अशी चर्चा महागाव परिसरात सुरू आहे.
राजकीय पार्श्वभूमी आणि इशारा
उमरखेड नगरपालिका आणि ढाणकी नगरपंचायतीत भारतीय जनता पार्टीला नागरिकांनी नाकारले आहे. उमरखेडमध्ये नितीन भुतडा यांच्या पत्नी निधी यांना पराभवाचा सामना करावा लागला. कामगिरीवर असमाधान व्यक्त करत मतदारांनी सत्तांतर घडवून आणले.
त्याच पार्श्वभूमीवर महागावमध्येही शुद्ध पाणीपुरवठा, नाल्यांची स्वच्छता, कचरा व्यवस्थापन, डम्पिंग ग्राउंड समस्या, प्रभाग क्रमांक १ मधील मंजूर रस्ता पूर्ण करणे अशा मूलभूत प्रश्नांवर तातडीने निर्णय घेणे आवश्यक आहे.
निवडणुकीपूर्वी कामांचा आरसा दाखवावा लागणार
आठ ते नऊ महिन्यांत होणाऱ्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नगराध्यक्ष आणि सत्ताधाऱ्यांना कामगिरीचा ठोस आरसा दाखवावा लागणार आहे. अन्यथा “बोलाचा भात, बोलाची कढी” अशी परिस्थिती निर्माण होण्याची भीती व्यक्त होत आहे.
महागाव नगरपंचायतीत बदलाची अपेक्षा आहे; आता ती प्रत्यक्ष कृतीतून सिद्ध करण्याची वेळ आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button