शिवाजी महाराजांच्या स्मारकाचे सुशोभीकरण व पुतळ्याचे तत्काळ अनावरण करा.

शिवप्रेमी महाराष्ट्र संघटनेची मागणी : एसडीओंना निवेदन
सहसंपादक शेख मुजाहिद
उमरखेड शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य अश्वारूढ स्मारक उभारणीसाठी मागील पाच ते सहा वर्षांपासून प्रशासनाकडून दिरंगाई होत असून ताडपत्रीने झाकून ठेवलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा, अपूर्ण चबुतरा व स्मारकाभोवती असलेला पेट्रोल पंपाचा, पेट्रोल पंपाच्या छताचा व इतर बाबींचा अतिक्रमणाचा विळखा यातुन मोकळा श्वास देण्यासाठी एका महिन्याच्या आत प्रशासनाने सुशोभीकरण करून अनावरण करावे, अन्यथा लोकसहभागातून स्मारकाचे अनावरण करू असा इशारा शिवप्रेमी महाराष्ट्र संघटनेच्या सरोजताई देशमुख व कार्यकर्त्यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे दिला आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य अश्वारूढ स्मारकासाठी शिवप्रेमींनी सातत्याने पाठपुरावा करून उपोषणे आंदोलने केली जेलची हवाही खाल्ली परंतु प्रशासनाने त्यांच्या आंदोलनाची दखल घेतली नाही, त्यामुळे शिवप्रेमी महाराष्ट्र संघटनेने नगरपरिषदेचे मुख्याधिकारी व उपविभागीय अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात, प्रशासनाकडून कुठलीही दिरंगाई न होता छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचे काम जलद गतीने व्हावे, स्मारकाच्या परिसरातील सर्व अतिक्रमणे व पेट्रोल पंपाचे छत हटवून सुशोभीकरण करावे, पुढील पंधरा दिवसात अनावरणाची प्रक्रिया व तारीख जाहीर करून येत्या एक महिन्याच्या आत अधिकृतरित्या अनावरण करण्यात यावे तसे न झाल्यास सर्व शिवप्रेमी एकत्र येऊन लोकसहभागातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वरूढ स्मारकाचे अनावरण करण्याचा निर्णय घेण्यात येईल, यादरम्यान शिवप्रेमी कडून होणाऱ्या स्मारकाच्या अनावरणामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्यास सर्वस्वी प्रशासन जबाबदार राहील असेही निवेदनात म्हटले आहे .

निवेदन शिवप्रेमी महाराष्ट्र संघटनेच्या सरोजताई देशमुख, विजय हरडफकर स्वप्निल कनवाळे अविनाश नरवाडे, दिनेश रावते, शुभम माने , दामोदर इंगोले, गोविंद इंगोले, गोलू कांबळे, गोपाल कलाने, एड. विजय गुजरे, चांदराव सुरोशे, वंदना घाडगे , ललिता खंदारे, अश्विनी संजय, यशोदा सोनटक्के, नंदाबाई तावडे, आशाताई गोरे रेखाताई भुते, सुरेखा पवार, वर्षा देवसरकर , शोभा राऊत, रंजना सुरोशे, राजकुमार खंदारे आदींनी दिले आहे.



